मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार आणि खासदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेना पक्षात मोठं खिंडार पडलं. यानंतर शिंदे गटाने शिवसेना पक्षावर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे ‘खरी शिवसेना’ कोणाची? ‘धनुष्यबाण’ कोणाला मिळणार? याचा निर्णय निवडणूक आयोगासमोर होणार आहे. त्यावर आता मंत्री शंभूराज देसाईंना भाष्य केलं आहे.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आमची भूमिका, कागदपत्रे निवडणूक आयोगापुढे मांडली आहे. धनुष्यबाण चिन्ह आमचचं असून, आम्हीच मूळ शिवसेना आहे. आम्ही शिवसेना सोडली नाही, पक्षांतर्गत नेतृत्वामुळे वेगळी भूमिका घेतली आहे. चिन्हावर आमचाच अधिकार आहे. खासदार, आमदार, सरपंच आणि पक्षसंघटनेतील पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा एकनाथ शिंदेंना आहे. त्यामुळे बहुमताचा विचार करून निवडणूक आयोग चिन्ह आम्हाला देईल,” असा विश्वास शंभूराज देसाईंनी व्यक्त केला. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
“शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारलं”
शिंदे गटाकडून दीड लाख तर शिवसेनेने नऊ लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे दाखल केले आहेत. याबाबत विचारले असता शंभूराज देसाई म्हणाले, “याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आपल्याला सांगतील. पण, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा दुप्पट तिप्पट गर्दी एकनाथ शिंदेंच्या सभेला होती. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशातल्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारलं आहे.”