उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी ( ३० मे ) रात्री उशीरा भेट घेतली. ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वातास बैठक चालली. या बैठकीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर शिवसेना ( शिंदे गट ) आमदार शंभूराज देसाई यांनी ‘महायुतीला मदत करायची असेल, तर स्वागतच आहे,’ असं म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“राज ठाकरेंबरोबर झालेल्या बैठकीबाबत फडणवीसांना विचारलं. त्यावर ‘सहज बऱ्याच दिवसांपासून गप्पा मारायच्या होत्या. मलाही वेळ असल्याने गेलो होतो,’ असं फडणवीसांनी सांगितलं. जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा आणि शिवसेनेबरोबर नवीन मित्र आलेच, तर चांगलंच आहे. भाजपा, शिवसेना आणि महायुतीला मदत करायची तर स्वागतच आहे,” असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
हेही वाचा : “पूर्ण ठाकरे गट असंतुष्ट आहे”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर विनायक राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
“शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक आणि वेगवेगळे उपक्रम संपूर्ण राज्यातील जिल्ह्यात राबवले जातात. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या वर्धापन दिनाला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं पूजन करत सामाजिक उपक्रमातून साजरा करणार आहोत,” असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं.
हेही वाचा : ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या बैठकीत नेमकं काय चर्चा झाली? अरविंद सावंत माहिती देत म्हणाले…
राज ठाकरेंच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलं आहे. “बऱ्याच दिवसांपासून आमचं ठरलं होतं की, एक दिवस गप्पा मारायला बसू. त्यामुळे कालचा मुहूर्त निघाला. आम्ही गप्पा मारण्यासाठी बसलो होतो. असे ठरलं होतं की, या भेटीत राजकीय विषय सोडून गप्पा मारायच्या,” अशी स्पष्टोक्ती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.