अलिबाग – उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या स्पीड बोटीला मांडवा येथे अपघात झाला. चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने स्पीड बोट जेटीच्या खांबाना जाऊन धडकली. बोटीचा वेग कमी असल्याने यावेळी सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनासंदर्भातील बैठकीसाठी सामंत गेट वे ऑफ इंडियावरून मांडवा येथे स्पीड बोटीने निघाले होते. यावेळी छत्रपती संभाजीराजे त्यांच्या समवेत होते. मांडवा जेट्टीजवळ पोहोचल्यावर चालकाने जेटीवर लावण्यासाठी बोट वळवली. मात्र यावेळी चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट जेटीच्या खालील खांबाना जाऊन धडकली. सुदैवाने बोटीचा वेग कमी असल्याने यावेळी मोठी दुर्घटना घडली नाही. नंतर मात्र बोट चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवून बोट तरंगत्या तराफ्यावर सुखरूप लावली. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

हेही वाचा – “आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार”, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

यानंतर पालकमंत्री सामंत हे मांडवा येथे सुखरूप उतरून रस्ते मार्गाने अलिबागकडे रवाना झाले. मात्र पालकमंत्र्यांच्या स्पीड बोटला झालेल्या या अपघातामुळे, स्पीड बोटमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आला आहे. स्पीड चालकांची बेपर्वाई प्रवाशांच्या जिवावर बेतण्याची शक्यता असल्याने मेरीटाईम बोर्डाने या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा – “…तर बाळासाहेब थोरात भाजपात जातील”, शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा

सुरवातीला काय घडत आहे याचा अंदाज आम्हाला आला नाही. बोट जाऊन खांबाना आपटली तेव्हा लक्षात आले हे काही तरी भयंकर घडते आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना झाली नाही. काही दिवसांपूर्वी याच मार्गावर प्रवास करताना स्पीड बोट वाटेतच बंद पडली होती. यापुढे स्थानिक आमदारांनासोबत घेऊनच स्पीड बोटीने प्रवास करण्याचे मी ठरवले आहे, असे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister uday samant boat accident at mandwa ssb
Show comments