छत्रपती संभाजीनगर – मराठी भाषेचे आद्यकवी मुकुंदराज यांनी जेथे ‘विवेकसिंधु’ या ग्रंथाची रचना केली त्या अंबाजोगाईला ‘कवितांचे गाव’ (पुस्तकांचे गाव) म्हणून मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी बुधवारी जाहीर केले.
येत्या दोन महिन्यांत यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली जाईल. आद्यकवी मुकुंदराजांचे समाधिस्थळ, योगेश्वरी, खोलेश्वर महाविद्यालय, शासकीय महाविद्यालय व उपजिल्हाधिकारी कार्यालय ही ‘कवितांचे गाव’मधील प्रमुख पाच दालने असतील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. आद्यकवी मुकुंदराज यांच्या नावाने वाङ्मयीन पुरस्कार सुरू करण्याची काही साहित्यिकांनी मागणी केली असून, त्याचाही सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही सामंत म्हणाले.
उद्योग तथा मराठी भाषामंत्री उदय सामंत हे बुधवारी बीड दौऱ्यावर होते. उद्योग परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार बैठकीत सामंत यांनी अंबाजोगाईला कवितांचे गाव म्हणून घोषित करण्याचा निर्णय जाहीर केला.
दरम्यान, अंबाजोगाईच्या ‘कवितांचे गाव’ उपक्रमासाठी समन्वय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची तर सहसमन्वयक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी काढले आहे. त्यांनी या पत्रात म्हटले आहे की, मराठी भाषेचा उगम बीड जिल्ह्यातील अंबाजागोई येथे मानला जातो.
मराठी भाषेतील आद्यकवी मुकुंदराज यांनी ‘विवेकसिंधू’ ग्रंथाची निर्मिती अंबाजोगाई परिसरातच केलेली असल्याने या स्थळास साहित्यिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील काव्यपरंपरा ही विशेष उल्लेखनीय असून, नवोदित कवींना प्रेरणा देणारी आहे.