ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या वॉर्ड क्रमांक १६ मधून अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून जाण्याच्या घटनेला आठ दिवसांचा कालावधी झाला. मात्र अद्यापही ललित पाटील याचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले नाही. पण या घटनेत राज्य सरकारमधील शिंदे गटाच्या मंत्र्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नेत्याचं थेट नाव घेऊन आरोप केला आहे. ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्याकरता दादा भुसे यांनी फोन केला होता, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. यावर दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सुषमा अंधारेंचा आरोप काय?
“ललित पाटीलला दाखल करण्याकरता ससून प्रशासन उदासीन होतं. ससूनच्या प्रशासनावर दबाव आणून तिथे दाखल करण्यासाठी कोणी फोन केला? हे एकदा तपासलं पाहिजे. कोणत्या आमदाराचा फोन होता, हे तपासलं पाहिजे. मी थेट नाव घेऊन सांगेन की दादा भुसेंचे फोन रेकॉर्ड चेक करून घ्यावेत”, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसंच, दादा भुसे नाशिकचे आमदार आहेत, तसंच ललित पाटीलही नाशिकचा असल्याने दादा भुसेंकडे सर्वाधिक रोख असल्याचंही सुषमा अंधारे म्हणाले. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.
दादा भुसेंचं स्पष्टीकरण काय?
“सुषमा अंधारे यांनी प्रचंड मोठा आरोप केला आहे. सुषमा अंधारे यांचा महिला म्हणून आदर करतो. त्यांना ज्या पद्धतीची चौकशी अपेक्षित असेल त्यांनी ती करावी. त्या चौकशीतून जे सिद्ध होईल ते जगासमोर येईल. आठ दिवसांत चौकशी करून त्यांनी केलेले आरोप पाठीमागे घेतले नाहीत तर मानहानीचा गुन्हा दाखल करेन, असा इशारा दादा भुसे यांनी दिला आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
हेही वाचा >> अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात शिंदे गटातील मंत्र्यांचा सहभाग, आमदार रविंद्र धंगेकरांचा सनसनाटी आरोप
आमदार रविंद्र धंगेकर यांनीही केला होता आरोप
ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या वॉर्ड क्रमांक १६ मधून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून जाण्याच्या घटनेला आठ दिवस झाले आहे. त्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ससून रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. त्या सर्व घडामोडी दरम्यान कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांच्या कार्यालयात जाऊन अमली पदार्थ तस्कर ललित पाटील या आरोपीला नेमका कोणता आजार झाला होता. नऊ महिने कोणत्या आजारावर उपचार सुरू होते. रूग्णालयात एवढी सुरक्षा यंत्रणा असताना देखील आरोपी कसा पळून गेला. या सर्व प्रश्नांचा भडीमार केला. या प्रश्नांना अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांना कोणत्याही प्रकारची समाधानकारक उत्तर देण्यात आली आहे. त्यानंतर वॉर्ड क्रमांक १६ ची आमदार रविंद्र धंगेकर यांनी पाहणी केली.
मेफेड्रोन तयार करण्यात पाटील वाकबगार
ससून रुग्णालयात उपचार घेणारा कैदी ललित पाटील याला चाकण परिसरात २०२० मध्ये अंमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून १६ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. पाटील स्वत: मेफेड्रोन तयार करत असल्याची माहिती पोेलिसांनी न्यायालयात दिली. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. मात्र त्यानंतर, २ ऑक्टोबर रोजी तो रुग्णालयातून फरार झाला आहे. आठ दिवस झाले तरी पोलीस त्याला पकडू शकलेले नाहीत.