सोलापूर : राज्यात गाजत असलेल्या आणि पोलीस यंत्रणेवर तपासाच्या अनुषंगाने मोठा दबाव आलेल्या मंगळवेढा तालुक्यातील प्रतीक शिवशरण या मुलाच्या अपहरण व निर्घृण हत्येप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे राहणाऱ्या प्रतीक मधुकर शिवशरण (वय ९) या शाळकरी मुलाचे गेल्या २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. त्यानंतर सहाव्या दिवशी माचणूर गावच्या शिवारात उसाच्या फडात प्रतीकचा मृतदेह निर्घृणपणे खून करून टाकलेल्या अवस्थेत मिळून आला होता. त्याच्या डोक्याचे केस संपूर्णत: कापलेले, डावा पाय पूर्ण तोडून गायब केलेला आढळून आला होता. तेथेच हिरव्या रंगाची चोळी, बांगडय़ाही मिळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय बळावला होता.

या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेला अल्पवयीन मुलगा मृत प्रतीकच्याच गावातील राहणारा आहे. गुन्ह्यशी संबंधित काही संशयित वस्तू त्याच्या घरात पोलिसांनी घेतलेल्या झडतीत मिळून आल्यानंतर त्यास तपासाकामी ताब्यात घेण्यात आले आहे. प्रतीकचे अपहरण आणि खून या अल्पवयीन मुलाने केल्याबाबतचे काही साक्षीपुरावेही मिळाल्याचा दावा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केला आहे.

या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन प्राथमिक तपास केल्यानंतर सोलापूरच्या बाल न्यायमंडळासमोर हजर केले असता त्याची रवानगी जिल्हा बाल अभिक्षणगृहात (रिमांड होम) करण्यात आली. प्रतीकचा खून नरबळीच्या उद्देशाने झाला नाही. तसा कोणताही पुरावा समोर आला नाही, असेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र या गुन्ह्याचा तपास अर्धवट असून लवकरच गुन्ह्याचा नेमका हेतू समोर येऊ  शकेल, असेही त्यांनी नमूद केले.

या गुन्ह्यची उकल होण्यासाठी पोलीस प्रशासनावर मोठा दबाव आला होता. प्रतीकचे अपहरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून मंगळवेढय़ात जनआंदोलन सुरू झाले होते. जनहित शेतकरी संघटनेने हे आंदोलन तीव्र केले असताना दुसरीकडे विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळींची माचणूर येथे मृत प्रतीकच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रीघ लागली होती. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे माचणूरमध्ये आले असता तेथे गावकऱ्यांचा पोलिसांच्या विरोधात रोष वाढला होता. त्या वेळी एकही जबाबदार पोलीस अधिकारी हजर नसल्यामुळे आठवले हे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यावर संतापले होते. या पाश्र्वभूमीवर अखेर अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने या गुन्ह्याचे धागेदोरे उलगडत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

मंगळवेढय़ाचे पोलीस उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, गिरी गोसावी, अरुण सावंत आदींनी गुन्ह्याचे धागेदोरे उकलण्यात भूमिका बजावली.