दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून रविवारी दिवसभर टिळकनगरला दोन गटांत वादावादी सुरू होती. त्यातून झालेल्या संघर्षांत एका गटाने सोनवणे वस्तीवर सशस्त्र हल्ला चढविला. त्यात १६ वर्षे वयाच्या मुलाचा खून करण्यात आला. तर दोघांना गंभीर जखमी करण्यात आले. गावठी पिस्तुलातून गोळी घालून हा खून करण्यात आला, असे फिर्यादीत म्हटले आहे. रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष भीमा बागूल याच्यासह तिघांना खूनप्रकरणी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना दि. ५ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पक्षाच्या विद्यार्थी आघाडीचा जिल्हाध्यक्ष सागर भोसले याच्यासह २० ते २५ आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी घटनेनंतर टिळकनगर व दत्तनगरला कोम्बिंग ऑपरेशन केले. फिर्यादी व आरोपी हे दोघेही रिपब्लिकन पक्षाच्या खासदार रामदास आठवले गटाचे कार्यकर्ते आहेत. दोन गटांत पूर्वीपासून वाद होते. निमित्त दुचाकीचा धक्का लागल्याचे असले तरी खरे कारण हे वेगळेच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीनेही तपास सुरू झाला आहे. सशस्त्र हल्ल्यात आदेश प्रकाश लोखंडे (वय १६) या दहावीच्या वर्गातील मुलाचा मृत्यू झाला आहे. आदेशचा मृत्यू हा गोळी घालून झाला की मारहाणीत झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. गंभीर जखमी दिलीप जगन्नाथ पठारे (वय ४३) व छाया दिलीप पठारे (वय ४५) यांच्यावर साखर कामगार रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
खासदार रामदास आठवले यांनी आज दूरध्वनी करून घटनेची माहिती घेतली. तसेच जखमी छाया पठारे यांची विचारपूस केली. घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. दोषी असणा-या गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही, असे आठवले यांनी सांगितले. पक्षाचा जिल्हाध्यक्ष बागूल व भोसले या दोघांनाही पक्षातून काढून टाकण्यात येणार आहे. बागूल याने घटना घडली तेव्हा आपण सिन्नरला होतो, आपला खुनात सहभाग नाही, मात्र पक्षाच्या गटबाजीतून आपल्याला गोवण्यात आल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी मात्र फिर्यादीत बागूल याचे नाव आहे. तपासात सत्य पुढे येईल, असे सांगितले.
टिळकनगर कारखान्याच्यासमोर शेती महामंडळाच्या जागेत लक्ष्मण सोनवणे हे राहतात. त्यांची भाची माया दीपक शिंदे (वय २०) यांचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले होते. माया शिंदे, आदेश लोखंडे व अक्षय पठारे हे तिघे पल्सर मोटारसायकलवर दुकानातून किराणा आणण्यासाठी आले होते. या वेळी हुल्या व माघाडे याला धक्का लागला. या वेळी भोसले व लोखंडे यात वादावादी झाली. नंतर काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या शहरातील लोकांनी दुचाकीवर टिळकनगर गावातून फेरी मारली. त्यांच्या हातात लाकडी दांडके होते. ही टोळी शिवीगाळ करत फिरत होती. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस आल्यानंतर हे लोक फरार झाले. मात्र त्यानंतर प्रकरण चिघळले. रात्री अकराच्या सुमारास सोनवणेवस्तीवर मोठा जमाव चालून गेला. त्यांना बघून वस्तीवरील लोक पळाले. पण आदेश लोखंडे, दिलीप पठारे व छाया पठारे हे सापडले. त्यांना जमावाने मारहाण केली. लोखंडे याचे केस पकडून त्याच्या डोक्यात गोळी घालण्यात आली. लोखंडेचा मृत्यू झाल्यानंतर जमाव निघून गेला. आज रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष भीमा बागूल, बबन गवजी माघाडे (वय ३९), शरद अशोक कोरडे (वय ३१) यांना अटक केली.
शहर पोलीस ठाण्यात माया दीपक िशदे (वय २०) यांनी फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार सागर भोसले, भीमा बागूल, योगेश त्रिभुवन बाबा माघाडे, शरद कोरडे, सनी त्रिभुवन, दीपक त्रिभुवन, अजय शिंदे, किरण कोळगे, सागर कोळगे, सचिन सोनवणे आदी २० ते २५ जणांविरुद्ध दंगल, खून, खुनाचा प्रयत्न, शिवीगाळ व भारतीय हत्या नियमन अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Story img Loader