सोलापूर : कर्नाटकातील रायचूर व विजयपूर येथील यात्रेला जाऊन रेल्वे गाडीने सोलापूरकडे परतणाऱ्या एका कुटुंबीयातील चार वर्षांची चिमुकली मुलगी अज्ञात समाजकंटकांनी रेल्वे गाडीवर केलेल्या दगडफेकीत गंभीर जखमी होऊन मरण पावली. शहरानजीक होटगीजवळ दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.

आरोही अजित करंगे असे या घटनेचा बळी ठरलेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. तिचे आई-वडील उत्तर सोलापूर तालुक्यातील होनसळ येथे राहणारे आहेत. आपल्या डोळ्यादेखत लाडक्या मुलीचा हकनाक बळी गेल्याने आई-वडिलांसह आजीला धक्का बसला आहे.

करंगे कुटुंबीय कर्नाटकात देवाच्या यात्रेला गेले होते. यात्रा संपवून विजयपूर पॅसेंजर रेल्वेने सोलापूरकडे परत येत असताना शहरानजीक होटगी-टिकेकरवाडी दरम्यान अज्ञात टवाळखोर समाजकंटकांनी रेल्वे गाडीच्या दिशेने दगड फेकले. त्यावेळी रेल्वे डब्यात खिडकीजवळ हसत खेळत असलेल्या चिमुकल्या आरोही हिच्या डोक्यात दगड बसला. यात गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने आरोही बेशुद्ध पडली. तिला तातडीने सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तिने प्राण सोडले होते. या घटनेची नोंद सोलापूर रेल्वे पोलीस ठाण्यात झाली आहे.