जिल्ह्याच्या रावेर तालुक्यात दोधे येथे विनयभंग झाल्यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनीने बदनामीच्या भीतीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात ती ८७ टक्के भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेतील संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.
दोधे येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीची जितेंद्र कोळी हा नेहमी छेड काढत असे. सोमवारी आई-वडील शेतात गेल्याने ही विद्यार्थिनी घरात एकटीच असल्याचे पाहून जितेंद्रने घरात घुसून विनयभंग केला. हा प्रकार एका व्यक्तीने पाहिल्यानंतर जितेंद्रने पळ काढला. या प्रकाराने भयभीत झालेल्या त्या विद्यार्थिनीने आई-वडील रागावतील व समाजातही आपली बदनामी होईल या भीतीने रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. गंभीर अवस्थेतील त्या मुलीला प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच पोलिसांनी तालुका दंडाधिकाऱ्यांसमक्ष तिचा जबाब नोंदवून घेतला. त्यावरून जितेंद्र कोळी यास अटक करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.