नाशिक शहरातून अल्पवयीन मुलीला पळवून तिला देहविक्री करण्यास भाग पाडण्याचा प्रकार धुळ्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन महिलांसह पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अटकेतील दोघांना न्यायालयाने चार फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गस्ती पथकातील पोलिसांना १६ वर्षे वयाची मुलगी भेदरलेल्या अवस्थेत शहरातील एका ठिकाणी आढळून आली. तिची चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा जाला. नाशिकमधील उत्तमनगर परिसरात पंडित कॉलनीत वास्तव्य असलेल्या कुटुंबातील या मुलीला किराणा दुकानात कामाला लावून देण्याचे आश्वासन देत सपना उर्फ प्रणिता पाटील (रा. कॅनडा कॉर्नर, नाशिक) हिने त्या मुलीला धुळ्यात पळवून आणले. नगाव (ता. धुळे) शिवारातील एका घरात तब्बल अडीच महिने डांबून ठेवल्याने मेटाकुटीस आलेली ती मुलगी संधी मिळताच घराबाहेर पडली. तिच्याकडून जबरदस्तीने देहविक्री करून घेण्यात येत असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली.
या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घर मालकीण बेबीबाई उर्फ विठाबाई संतोष चौधरी, गणेश चौधरी, सपना उर्फ प्रणिता पाटील, संजय बोरसे (सोनगीर), अनिल पवार यांसह नऊ जणांचा संशयितांमध्ये समावेश आहे. त्यात एका पत्रकाराचेही नाव घेण्यात आले आहे. बेबीबाई चौधरी व सचिन अग्रवाल यांना न्यायालयाने चार फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र पथक स्थापन करावे, राजकीय दबावाला तपास अधिकाऱ्यांनी बळी पडू नये असे स्पष्ट करत शिवसेनेने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या संदर्भात महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडे निवेदन दिले आहे. तर पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनाही निवेदन देण्यात आले आहे. कथित बेबीबाईचा भूतकाळ आणि तिच्या विरुद्ध पोलिसांनी यापूर्वी केलेली कारवाई सर्वश्रृत असताना नेमके तिला कोणाचे अभय आहे, असा प्रश्न शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी केला आहे. बेबीबाई चौधरी हिचा देवपूरमधील अवैध व्यवसाय तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी मोडीत काढला होता. देवपुरातील रहिवाशांनी तिला एकजुटीने हुसकावून लावले होते. नंतर तिने नगाव शिवारात आणि शिक्षण संस्थांच्या इमारती, वसतीगृहे असलेल्या जागेवर घर बांधून आपली व्यावसायिक पाश्र्वभूमी अधोरेखित केली असा आरोप माळी यांनी केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा