अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १०७ बलात्काराच्या घटना समोर आल्या. चिंताजनक बाब म्हणजे यातील ७४ प्रकरणे ही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची होती. म्हणजेच जिल्ह्यात दाखल होणाऱ्या ७३ टक्के गुन्हे हे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराशी निगडीत असल्याची चिंताजनक बाब आहे.
महिलांवरील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी देशात कठोर कायदे अस्तित्वात असले तरी अत्याचाराचे प्रमाण कमी झालेले नाही. मुंबई आणि ठाणे यांसारख्या महानगरी जिल्ह्यांना लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातही याचीच प्रचिती येत आहे. २०१९- २० पर्यंत रायगड जिल्ह्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे सरासरी वार्षिक ५० गुन्हे दाखल होत होते. गेल्या तीन वर्षांत महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरी १०० गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. यातही पॉस्को अर्थात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. बलात्काराचे १०७ पैकी ७४ गुन्हे हे पॉस्को कायद्या अंतर्गतचे आहेत. म्हणजेच ही सर्व प्रकरणे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराशी निगडीत आहेत.
बलात्काराचे दाखल गुन्हे
वर्ष गुन्हे
२०१९ ४९
२०२० ५८
२०२१ ५७
२०२२ १०६
२०२३ १००
२०२४ १०७
अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार हा गंभीर विषय आहे. याबाबत कोणती ठोस पावले उचला येतील यासाठी, गृह विभाग आणि महिला आयोग यांच्याशी चर्चा करावी लागेल, किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्याबाबत प्रयत्न करता येऊ शकतील.– आदिती तटकरे, महिला व बाल विकास मंत्री.
पूर्वी बदनामी होईल या भीतीने पिडीत मुलगी अथवा तीचे पालक तक्रारीसाठी समोर येत नसत, आता जागृकता वाढल्याने, पिडीत मुली आणि तीचे पालक तक्रारीसाठी समोर येऊ लागले आहे. त्यामुळे दाखल गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. पण पोलीस अशा गुन्ह्याबाबत अतिशय संवेदनशील आहेत. वर्षभरात दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केली आहेत. – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड