मलकापूरमध्ये एका रॅलीमध्ये दोन गटात वाद झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या वादावादीचे पर्यावसन हाणामारीत झाल्याने दोन्ही बाजूने जोरदार दगडफेक झाली आणि याचे लोण अवघ्या काही वेळेत संपूर्ण शहरात पसरले. या दगडफेकीमध्ये आमदार, नगराध्यक्ष आणि पोलीस अधिकारीही जखमी झाले असून शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मलकापूरमधील साळीपूरामध्ये ईदनिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत जात असताना दुचाकीवरुन फिरणा-या तरुणांमध्ये वाद झाला. या वादातून दोन गटांमध्ये दगडफेक सुरु झाली. या घटनेचे वृत्त शहरात पसरताच तणाव निर्माण झाला. शहरातील दुकाने तात्काळ बंद झाली. तर काही समाजकंटकांनी रिक्षा आणि वाहनांना पेटवून दिल्याने तणावात भर पडली. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. समाजकंटकांनी पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करत जाळपोळ केली. शेवटी बुलढाणा आणि खामगावमधून अतिरिक्त पोलीस बळाला पाचारण करण्यात आले. याशिवाय दंगलविरोधी पथक आणि राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडीही शहरात तैनात करण्यात आली आहे. काही काळासाठी शहरात संचारबंदीही लागू करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडून हवेत गोळीबार केला. जमावाला शांत करण्यासाठी गेलेले नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ, आमदार चैनसुख संचेती हेदेखील दगडफेकीत जखमी झाले. पोलीस उपअधीक्षक राजेंद्र सोळंके, एपीआय प्रकाश डाबरे, पोलीस हवालदार प्रमोद राऊत, प्रदीव जाधव, जितेश सुशीर, साहेबराव सोनोने, सचिन सदाफळे, हिरा पलुवाले हेदेखील यात जखमी झाले आहेत.

सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावला आहे. गोंधळ घालणाऱ्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे ८० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मलकापूर येथे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.विठ्ठल जाधव, जिल्हाधिकारी विजय झाडे, जिल्हा पोलिस अधीक्षक  संजय बाविस्कर आदींनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकारी मलकापूरमध्ये तळ ठोकून आहेत. दरम्यान, मलकापूर रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या भुसावळ-वर्धा सवारी गाडीवरही  दगडफेक झाल्याची माहिती आहे. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

सध्या शांतता – बाविस्कर

मलकापूरमध्ये वादातून दगडफेक झाली होती. त्यामध्ये ८ ते १० पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाला शांत करण्यासाठी हवेत गोळीबार करावा लागला. या प्रकरणी सुमारे ८० जणांना ताब्यात घेतले असून, चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. मलकापूरमध्ये सध्या शांतता आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतांना दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor rioting in malkapur 80 detained
Show comments