कट्टर हिंदुत्वाची झळ सहन करणाऱ्या अल्पसंख्याकांना जवळ करण्याची भाषा नक्षलवाद्यांनी करताच मुस्लीम समाजातील युवकांमध्ये पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. दहशतवादाच्या मुद्दय़ावरून नेहमी पोलिसांच्या रडारवर राहिलेला हा युवक आता नक्षलवादाच्या प्रश्नावरसुद्धा तेच घडेल का या विवंचनेत असल्याचे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.  
 देशभरातील चळवळीची पुनर्बाधणी करण्याच्या प्रयत्नात असलेले नक्षलवादी आता चळवळीतील जनतेचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्नशील असून अल्पसंख्याकांना जवळ करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’त प्रकाशित झाले होते. या वृत्तामुळे अस्वस्थ झालेल्या हकीम यांनी आज स्वत:हून प्रस्तुत प्रतिनिधीशी संपर्क साधून आपल्या भावना व्यक्त केल्या. देशात दहशतवाद्यांकडून बाँबस्फोट घडवून आणल्यानंतर पोलीस प्रामुख्याने मुस्लीम युवकांना लक्ष्य करतात. जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण निरपराधांना त्रास होता कामा नये, असे मत हकीम यांनी व्यक्त केले. पोलिसांनी अटक केलेल्या अनेक युवकांची नंतर निर्दोष सुटका झाली आहे. बंगलोरला तर खटला दाखल होण्याच्या आधीच युवकांना सोडावे लागले आहे. या पाश्र्वभूमीवर आता नक्षलवाद्यांनीसुद्धा अल्पसंख्याकांना जवळ करण्याची भाषा सुरू केल्याने मुस्लीम समाजात प्रचंड अस्वस्थता आहे.
‘लोकसत्ता’तील वृत्त वाचून अनेकांनी ही भावना आपल्याजवळ बोलून दाखवली. आता या मुद्दय़ावरसुद्धा युवकांना त्रास दिला जाऊ शकतो, असे अनेकांचे म्हणणे होते. त्यामुळेच मी संपर्क साधला, असे हकीम यांनी आज बोलताना सांगितले. सदर वृत्त नक्षलवाद्यांच्या एका बैठकीच्या इतिवृत्तावर आधारित होते. या इतिवृत्तात अल्पसंख्याकांना जवळ करण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. नक्षलवाद्यांच्या याच बैठकीत तुर्कस्थान, फिलिपाइन्स व बांगलादेशात सुरू असलेल्या क्रांतिकारी चळवळीवर बराच खल झाला. या चळवळीला ‘माओवादी चळवळ’ असे संबोधून त्यात बळी गेलेल्या व्यक्तींना याच बैठकीत श्रद्धांजलीसुद्धा वाहण्यात आली. त्याचा स्पष्ट उल्लेख या इतिवृत्तात करण्यात आला आहे.  शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानातून नक्षलवाद्यांना सक्रिय मदत केली जाते याचे पुरावे भारत सरकारकडे आहेत. काही महिन्यांपूर्वी झारखंडमध्ये शहीद पोलिसांच्या शरीरात नक्षलवाद्यांनी ठेवलेली स्फोटके पाकिस्तानी बनावटीची होती हे नंतर सिद्ध झाले होते. त्यामुळे नक्षलवाद्यांनी अबुजमाड पहाडावर झालेल्या या बैठकीत अल्पसंख्याकांना सोबत घेण्याचा मुद्दा जाणीवपूर्वक समोर आणल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. या चळवळीचा प्रभाव असलेला दंडकारण्य भाग आदिवासीबहुल असला तरी त्यात मुस्लीम समुदायाचे लोकसुद्धा आहेत. या समुदायातील तरुणांनी या चळवळीला जवळ केले असे ठळक उदाहरण मात्र आजवर आढळून आले नाही. भामरागड, छत्तीसगडमधील बिजापूर या जिल्हय़ात मुस्लीम लोकवस्ती मोठय़ा प्रमाणात आहे. या समाजातील युवक मोठय़ा संख्येत पोलीस दलात आहेत. सात वर्षांपूर्वी झालेल्या सलवा जुडूम अभियानातसुद्धा बरेच मुस्लीम युवक होते. या सर्व स्थितीचा अंदाज घेऊन नक्षलवाद्यांनी आता आदिवासी, मागास व दलित वर्गासोबत अल्पसंख्याक हा शब्द जोडून नवे संकेत दिले आहेत. नक्षलवाद्यांचे धोरण काहीही असले तरी आधीच संशयी नजरेमुळे बेजार झालेला मुस्लीम युवक यामुळे धास्तावला आहे, असे हकीम यांनी आज सांगितले. 

Story img Loader