सांगली : मिरज मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील राहिलेल्या उमेदवाराने शिवसेना (ठाकरे) गटाने बोलावलेल्या पत्रकार बैठकीत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यावर आगपाखड केल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे. पत्रकार बैठकीनंतर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी दिलगिरी व्यक्त केली असली, तरी काँग्रेस कार्यकर्त्यांचा रुसवा अद्याप कायम आहे.
मिरज विधानसभा मतदारसंघाची जागा कोणाला हे अखेरच्या क्षणापर्यंत अस्पष्ट होते. यामुळे काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी करणाऱ्या सी. आर. सांगलीकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र, महाविकास आघाडीमध्ये मिरजेत शिवसेना ठाकरे गटाचे तानाजी सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सांगलीकर यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यात आले. त्यांनी मुदतीत उमेदवारीही मागे घेतली. मात्र, आघाडीच्या सातपुते यांना पाठिंबा जाहीर केलेला नव्हता.
दोन दिवसांच्या चर्चेनंतर त्यांनी पत्रकार बैठकीत पाठिंबा जाहीर करण्याचे मान्य केले. यानुसार बैठक बोलावण्यात आली. मात्र, या वेळी त्यांनी पाठिंबा जाहीर करण्यापूर्वी भूमिका मांडत असताना काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील हे केवळ पै-पाहुण्यांचे राजकारण करतात. त्यांना आंबेडकरी समाजाची मते हवीत; मात्र संधी देण्याची इच्छा नसते. त्यांचे स्वार्थी राजकारण असून, यापुढील काळात त्यांना आंबेडकरी समाजाचे मतदानच होऊ देणार नाही. पुढच्या लोकसभा निवडणुकीत मला पक्षाने संधी दिली, तर ठीक अन्यथा मी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करून प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देणार, असेही जाहीर केले.
तथापि, या वेळी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, जिल्हा संघटक बजरंग पाटील, उमेदवाराचे बंधू बसवेश्वर सातपुते यांची काँग्रेस नेत्यांवर आगपाखड केल्याने गोची झाली. पत्रकार बैठकीनंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी आमच्या नेत्यावर टीका होत असेल, तर आम्हाला गृहीत धरू नका, असे सांगितले आहे. अखेर जिल्हाप्रमुख विभुते यांनी या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली, तरी काँग्रेस कार्यकर्त्यांचा रुसवा अद्याप कायम आहे.