सांगली : मिरज झोनमधील अंडी दर रोज सकाळी साडेअकरा वाजता जाहीर केला जाईल या दरानुसार व्यावसायिक व्यापार्यांनी कामकाज करण्याचा निर्णय विटा येथे झालेल्या राष्ट्रीय अंडी समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. देशपातळीवरच्या कुक्कुटव्यावसायिकांची प्रातिनिधीक संस्था असलेल्या राष्ट्रीय अंडी समन्वय समिती अर्थात एनईसीसीच्या मिरज झोनमधील कुक्कुटव्यावसायीची एक व्यापक बैठक शनिवारी विटा यंत्रमाग संघाच्या सभागृहात संपन्न झाली.एनईसीसीचा मिरज झोन हा कोल्हापुर, सांगली व सातारा जिल्ह्यातील कुक्कुटव्यावसायींकासाठी निर्माण करण्यात आला असून यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मिरज विभागीय झोन कमिटीच्या माध्यमातून, देशांतर्गत अंडी उत्पादन, निर्यात व देशांतर्गत मागणी बाबतचा अभ्यास करुन अंडी दराबाबत समन्वय राखला जात असतो.
या अनुषंगाने झालेल्या बैठकीमध्ये मिरज झोनमधील व्यावसायिकांच्या विविध अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने अंडी दराबाबतचा गैरसमज दूर होऊन पूर्ण मिरज झोनचा एकच सर्वमान्य अंडी दर दररोज जाहीर व्हावा याबाबत चर्चेअंती एकमत करण्यात आले. या साठी झोनमधील विविध ठिकाणचे अंडी उत्पादक कुक्कुटव्यावसायिक व अंडी व्यापार्यांचा समावेश असलेली तेरा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. ही समिती बाजारपेठेची परिस्थिती अवलोकन करुन दररोज सकाळी साडेअकरा वाजता एकमताने अंडी दर जाहीर करेल व सर्व व्यावसायीक व अंडीव्यापार्यांनी या दरानुसार कामकाज करावे असा ठराव सर्वसहमतीने करण्यात आला.
येणार्या काळातील श्रावण महिना, गणपती उत्सवाच्या काळात अंडी खप प्रभावीत होत असतो. त्याबाबतही चर्चा व नियोजन करण्यात आले. कुक्कुटपालन केंद्रातील व परीसरातील स्वच्छता व रोगराई नियंत्रणाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीस समन्वय समितीचे समन्वयक सी.वसंतकुमार मिरज, किरण तारळेकर, झोन अध्यक्ष संजय पाटील बोरगांव, उपाध्यक्ष प्रशांत भोसले घानवड, सचिव वाय.आर.पाटील, सदस्य लक्ष्मणराव पाटील, शरद रावताळे, धनाजी देवकर, सुखदेव पाटील, मुकुंद लकडे, सचिन गायकवाड, अय्याज मुा, संजय रावताळे, रमेश होनराव, विक्रम फारणे कोल्हापुर, सागर म्हेत्रे, जयंत पाटील, चंद्रकांत जाधव, दिलीप डिसले कोल्हापुर, शिवाजी निंबाळकर कोल्हापुर या अंडी उत्पादकांसह शहाजी गडदरे, निलेश राठोड, आयलेशकुमार, महंमद बागवान मिरज हे अंडी व्यापारी व परिसरातील कुक्कुटव्यावसायीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.