रत्नागिरी : मिरकरवाडा येथील बंदर मलपीपेक्षाही ५०० कोटी खर्च करुन मोठे आणि अत्याधुनिक बंदर उभे होणार आहे, त्यामुळे याला विरोध न करता येथील लोकांनी मत्स्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीवर असणारी ३१९ अनधिकृत बांधकामांना पाडण्याची नोटीस मत्स्य विभागाने दिली होती. त्याची मुदत आता २६ जानेवारीला संपणार आहे. मात्र या विरोधात महिला मच्छीमारांनी मत्स्य विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत दौऱ्यावर असताना मच्छीमार लोकांनी त्यांची भेट घेतली व कारवाई स्थगित करावी अशी मागणी केली. मात्र यावेळी पालकमंत्र्यांनी या मच्छीमारांना बंदराच्या विकासाबाबत त्यांना सांगितले. या बंदर विकासाचा मच्छीमारांनाच फायदा व्हावा, बंदराचा विकास व्हावा यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे प्रयत्न करत आहेत. मात्र यात कोणताही आकस ठेवून कारवाई केली जात नाही. त्यामुळे मच्छीमारांनी आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, मत्स्य विभाग तातडीने कारवाई करणार नाही, असे सामंत यांनी सांगितले.
कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे मत्स्य बंदर असल्याने मलपीपेक्षाही मोठे आणि सुसज्ज बंदर उभारले जाणार आहे. जवळपास पाचशे कोटींचा आराखडा तयार केला जात असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.