लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर : जुगाराच्या गुन्ह्यात केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या रकमेचा अपहार झाल्याचा प्रकार सांगोला पोलीस ठाण्यात घडला. याप्रकरणी तत्कालीन नगदी कारकून म्हणून काम पाहिलेल्या एका सहायकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल झाला आहे. अपहाराची रक्कम सात लाख ८५ हजार ९६९ रुपये इतकी आहे. या गुन्ह्याची नोंद मंगळवेढा पोलीस ठाण्यात झाली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी या संदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार सांगोला पोलीस ठाण्यातील तत्कालीन नगदी कारकून, सहायक फौजदार अब्दुल लतीफ अमरुनद्दीन मुजावर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

आणखी वाचा-अत्याचार, छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

२०१६ ते २०२० या कालावधीत सांगोला पोलीस ठाण्याचे हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी जुगार खेळताना पोलिसांनी कारवाई करून जुगाराची रक्कम जप्त केली होती. जप्त रक्कम पोलीस ठाण्यातील दप्तरी नोंदवून ताब्यात ठेवण्याची जबाबदारी तत्कालीन नगदी कारकून म्हणून काम पाहणारे सहायक फौजदार अब्दुल लतीफ मुजावर यांच्यावर होती. त्यांनी जप्त रकमांची नोंद असलेली मुद्देमाल नोंदवही प्रमाणित करून घेणे आवश्यक होते. परंतु तसे न करता त्यांनी १४३ प्रकरणांमधील जप्त रकमेपैकी सात लाख ८५ हजार ९६९ रुपये इतक्या रकमेचा अपहार केल्याचे चौकशीत आढळून आले. मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश धवण हे पुढील तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Misappropriation of confiscated gambling money at sangola police station mrj