मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणीला महाराष्ट्रातून सुरुवात झाली आहे. परंतु, या योजनेसाठी गैरव्यवहार सुरू असल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यांनी याबाबत आज ट्वीट करून ही माहिती दिली.

“राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेसाठी महिलांची होणारी धावपळ अखंड महाराष्ट्रामध्ये आहे. या धावपळीचा फायदा घेऊन विरोधकांकडून सेतू केंद्रावर एजंट सोडले गेले आहेत. तलाठी कार्यालयात २० रु, महासेवा केंद्रात प्रति १५० ते २०० रु आकारणी सुरू आहे”, असा गंभीर दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला केंद्रीत अनेक योजना सुरू करणार असल्याचे घोषित केले. त्यानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याकरता १ जुलैपासून नाव नोंदणी सुरू झाली आहे. परंतु, योजनेतील निकषांमुळे अर्ज भरण्यास महिलांना अडचणी येत आहेत.

हेही वाचा >> Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घ्यायचा? कुठे कराल अर्ज? पात्र कोण? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

काय आहे लाडकी बहीण योजना?

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत २१ ते ६० वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. सुमारे एक कोटी महिलांना याचा लाभ होणार असून जुलैपासून या योजनेची अंमलबजाणी केली जाणार आहे. त्यासाठी सरकारवर वर्षाला ४६ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. १ जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत.

१ जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली असून १५ जुलैपर्यंत अर्ज संकलित करण्यात येणार आहेत. सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य देत हे काम पूर्णत्वास न्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला जात आहे. वयाची २१ वर्षे पूर्ण झालेल्या व ६० वर्षे ज्यांची पूर्ण झाली नाहीत अशा वयोगटातील महिलांनी हे अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करावयाची आहेत.