औरंगाबादमधील पिसादेवीच्या भगवान महावीर प्राथमिक शाळेने २०१४ सालापासून २०१८ सालापर्यंत एकूण सुमारे १६ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या शाळेने या कालावधीत सात पट प्राथमिक विद्यार्थ्यांची संख्या जास्त दाखवून १५ लाख ९५ हजार ३४३ रुपये हडप केल्याचा गुन्हा पंचायत समितीने सिडको पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरुन दाखल करण्यात आला आहे. भगवान महावीर प्राथमिक शाळा ही अंशत: २० टक्के अनुदानित शाळा पिसादेवी परिसरात असून परळीचे स्थानिक पुढारी जाधव यांची ही शाळा आहे.

केवळ ४९ विद्यार्थी असणार्‍या १ली ते ४ थी पर्यंतच्या शाळेने उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या ३५० असल्याचे पंचायत समितीला वेळोवेळी कळवून १६ लाख रुपये शासनाकडून हडप केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांच्या आदेशावरुन या प्रकरणात पंचायत समितीने हे पाऊल उचलले आहे.

पंचायत समितीला या प्रकरणाची प्राथमिक माहिती डिसेंबर २०१८ मधे मिळाल्यानंतर ८ डिसेंबर २०१८ ला या शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी पंचायत समितीचे अधिकारी पिसादेवी येथील भगवान महावीर शाळेत जाऊन पटसंख्येची तपासणी केली. प्रत्येक वेळी मुख्याध्यापक आपली ओळख लपवून शाळेतील कारकून असल्याची माहिती द्यायचे. हा प्रकार समजल्यानंतर जिल्हा परिषदेने या प्रकाराची खातरजमा करण्यासाठी १ जानेवारीला पुन्हा शाळेची पंचायत समितीकडून तपासणी करवून घेतली. तरीही त्या ठिकाणी उपस्थित असलेले मुख्याध्यापक आपली ओळख लपवत असल्याचे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बी.ए. देशपांडे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांच्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात शासनाला फसवण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

Story img Loader