सांंगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी वाटपाशी आपला काहीही संबंध नाही. विनाकारण अपप्रचार केला जात आहे. जिल्ह्यात काहीही झाले, तरी त्याच्याशी माझा संबंध जोडणे योग्य नाही. जागा वाटपात जे झाले ते झाले, सर्वांनी आघाडी धर्म पाळायला हवा, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील मेळाव्यात व्यक्त केली. मला इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जेवढे मताधिक्य मिळते, तेवढे मताधिक्य सत्यजित पाटील सरूडकर यांना देण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
इस्लामपूर येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, श्रीमती सरोज पाटील (माई), राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानूगडे- पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख अभिजित पाटील, युवा नेते प्रतिकदादा पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक प्रामुख्याने उपस्थित होते.
उमेदवार पाटील म्हणाले, भाजपाने गेल्या १० वर्षांत केवळ घोषणा आणि जाहिराती केल्या. सामान्य माणसाच्या हातात काहीही पडलेले नाही. मी १० वर्षे आमदार म्हणून काम केलेले आहे. आपणा सर्वांना बरोबर घेऊन मतदारसंघाच्या विकासाला चालना देईन. मी पक्ष, नेतृत्व आणि सामान्य जनतेशी १०० टक्के ईमान राखेन.
यावेळी प्रा. बानुगडे, जिल्हा प्रमुख पाटील, प्रतिक पाटील, श्रीमती पाटील आदींची भाषणे झाली. प्रारंभी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांनी स्वागत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुशांत कोळेकर, सौरभ सावंत यांनी सूत्रसंचालन केले. नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील यांनी आभार मानले.