मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून सध्या अनेक योजनांची घोषणा केली जात आहे. त्यामध्ये लाडकी बहीण, लाडका भाऊ आणि वयोवृद्धांसाठीही काही योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या या घोषणा फसव्या असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे; तर दुसरीकडे सरकारकडून या योजनांची मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी केली जात आहे. आता सरकारने केलेली अशीच एक जाहिरात चर्चेत आली आहे. कारण, राज्य सरकारच्या वृद्धांसाठी धार्मिक स्थळाचे दर्शन जाहिरातीत एका ज्येष्ठ नागरिकाचा फोटो चर्चेत आहे. हा वृद्ध इसम गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असून त्याचा फोटो थेट सरकारच्या जाहीरातीत झळकल्याने ही जाहिरात चर्चेत आली आहे.

हेही वाचा : Dhramveer 2: “माझ्या सिनेमात अनेकांचे मुखवटे…”, ‘धर्मवीर २’ नंतर देवेंद्र फडणवीसांना स्वतःचा सिनेमा काढण्याची इच्छा

बेपत्ता इसम सरकारच्या जाहिरातीत

राज्य सरकारकडून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या योजनेनुसार ६० वर्षे वयावरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना देशभरातील ६६ तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी ही योजना फायद्याची ठरु शकते, असे या योजनेच्या जाहिरातीतून सांगण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना सरकारकडून तब्बल ३० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. याच योजनेच्या जाहिरातीवर छापण्यात आलेल्या वृद्ध व्यक्तीचा फोटो सध्या चर्चेत आला आहे. ही वृद्ध व्यक्ती गेल्या तीन वर्षांपासून घरातून बेपत्ता असून ती थेट मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकल्याने तिच्या कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. मात्र, आता यावरुन राजकारण तापले असून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा : Sharad Pawar on Atul Benke : ‘कोण अतुल बेनके?’, अवघ्या तासाभरात शरद पवारांनी विधान बदलले; म्हणाले, “राजकारणात फडतूस..”

कोण आहे ही व्यक्ती?

“आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन” अशा आशयाचा मजकूर या जाहिरातीवर आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वरूडे या गावातील ज्ञानेश्वर विष्णू तांबे यांचा हा फोटो आहे. ते गेल्या तीन वर्षापासून ते बेपत्ता झाले होते. त्यांचा सगळीकडे शोध घेण्यात आला होता; मात्र, त्यांना शोधण्यात कुटुंबाला अपयश आले होते. अखेरीस मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनेच्या जाहिरातीमध्ये त्यांचा फोटो दिसल्यावर कुटुंबाला सुखद धक्का बसला आहे. याबाबत बोलताना ज्ञानेश्वर तांबे यांचे सुपुत्र भरत ज्ञानेश्वर तांबे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून आमचे वडील बेपत्ता होते. आम्ही सर्वजण त्यांचा सर्वत्र शोध घेत होतो. परंतु ते सापडत नव्हते, आता त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत दिसून आल्याने आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. मुख्यमंत्र्यांनी वडिलांची भेट घडवून आणावी अशी विनंती भरत यांनी केली आहे. दरम्यान तांबे यांचा फोटो कुठून आला यासंदर्भात सरकारने काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरुन महायुती सरकारवर टीकेचा भडीमार केला आहे. “इतक्या वेळा जाहिराती करुन भाजपा तोंडघशी पडली आहे. परत त्याच त्याच चुका करतात. एका जाहिरातीत सियाचीनचा भाग पाकिस्तानमध्ये दाखवला आहे; तर खोटी वाघनखे शिवाजी महाराजांची असल्याचे सांगून जाहिरातबाजी करत आहेत. हे सरकार स्वत:च्या जाहिरातींसाठी लोकांच्या भावनांशी खेळते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.”

Story img Loader