कराड : रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिन, बजाज फायनान्स, शासनाचा आरोग्य विभाग व सह्याद्री रुग्णालयाच्या माध्यमातून ‘मिशन प्रेरणा’ अभियानांतर्गत कराडच्या सह्याद्री रुग्णालयात केवळ ४५ दिवसांत ११८ गोरगरीब बालकांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले. त्यात एका साडेतीन वर्षांच्या बालकावर कराडमधील पहिलीच कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्याचे डॉ. अमित माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिनचे डॉ. सुधीन आपटे, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता लाळे, सह्याद्री रुग्णालयाचे सचिन कुलकर्णी, संचालक दिलीप चव्हाण, अमित चव्हाण, डॉक्टर, उपचार घेतलेली मुले, त्यांचे कुटुंबीय या वेळी उपस्थित होते.

डॉ. सचिन आपटे म्हणाले, की ‘रोटरी’ सामाजिक कार्यासह शिक्षण व आरोग्यावरही भर देत आहे. राज्यभर ‘मिशन मुस्कान’च्या कार्यात शासनाच्या आरोग्य विभागाचे चांगले सहकार्य लाभते. राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानांतर्गत गावोगावी बालकांच्या आरोग्याची तपासणी होते. तपासणीनुसार गरजू बालकांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार सुचवले जातात. आज बऱ्या झालेल्या बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिल्यानंतर आपल्याही मनाला समाधान मिळते.

सचिन कुलकर्णी म्हणाले, की ‘मिशन प्रेरणा’मुळे केवळ बालकांच्याच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. आर्थिक परिस्थिती नसलेल्या बालकांना मोफत उपचार मिळाल्याने त्यांच्या कुटुंबास मोठा दिलासा मिळत आहे. योग्य उपचारानंतर बालकांचे आयुष्यही सुसह्य होत आहे. विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने सह्याद्री रुग्णालय नेहमीच समाजातील गरजूंना मदत देत असते.

दिलीप चव्हाण म्हणाले, की पुणे, मुंबईच्या धर्तीवर रुग्णांना कमी खर्चात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात. मोठ्या उपचारांसाठी महानगरात जावे लागू नये, अशा सामाजिक उद्देशातूनच कराडला सह्याद्री रुग्णालयाची उभारणी झाली. मिशन प्रेरणामुळे मिळालेल्या मोफत उपचाराने जसे त्या बालकांचे जीवन सुखकर झाले, तसे त्यांच्या कुटुंबीयांनाही आर्थिक आधार मिळाला आहे.