छत्रपती संभाजीनगर, लातूर : लातूर येथून १२० वंदे भारत रेल्वेचे डबे तयार करण्यासाठी रशियाच्या मॉस्को ‘जेएससी मेट्रो वॅगन मॅश- मितीची’ (Mytischi) या कंपनीबरोबर झालेला करार अंमलबजावणीमध्ये आणण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मात्र, रेल्वे डबे निर्मितीची प्रक्रिया रशिया-युक्रेन युद्धामुळे थांबल्याची चर्चा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी फेटाळली. लातूर रेल्वे डबे निर्मिती कारखान्यासाठी रेल्वेच्या ‘आरव्हीएनएल’ कंपनीने ६२६ कोटी रुपये गुंतवले असून रशियातील कंपनीकडून वंदे भारत रेल्वे निर्मिती सुरू होईल, असा दावा रावसाहेब दानवे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना केला.
लातूर येथे ऑगस्ट २०१८ साली मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये पहिला डबा तयार करण्यात आला. त्यानंतर निविदा प्रक्रिया व अन्य कारणामुळे काम रेंगाळले. आता रेल्वे विकास निगम लिमिटेड या कंपनीची सर्व तयारी पूर्ण झाली असून रशियाच्या या कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. हे काम नाना कारणांनी रेंगाळले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणा आणि त्याच्या अंमलबजावणीविषयीची एक विशेष बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर या प्रकल्पाला चालना देण्यात आली.
हेही वाचा – पीक विमा कंपन्याची मुजोरी, राज्यातील ८४९ कोटी रुपयांची अग्रीम रक्कम थकीत
पहिला कोच बाहेर पडल्यानंतर रेल्वे विभागाने रेल्वे कोच फॅक्टरी स्वतः चालवायची की खासगी कंपनीला त्यात सहभागी करून घ्यायचे, यावर निर्णय व्हायला वेळ लागला. त्यानंतर रशिया स्थित खासगी कंपनी व रेल्वे विभागाने संयुक्तपणे हा प्रकल्प चालवण्याचा निर्णय घेतला आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई यांचे दैनंदिन कामकाजात नियंत्रण असणार आहे. देशात १९५५ साली तमिळनाडू (चेन्नई) येथे रेल्वे कोचचा पहिला कारखाना सुरू झाला. १९८६ साली पंजाब प्रांतातील कपूरथळा येथे दुसरा कारखाना सुरू झाला व उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघात २००९ साली तिसरा कारखाना सुरू झाला. यातून डबे बाहेर पडण्यास २०१४ साल उजाडले.
हेही वाचा – ….असेही बंधूप्रेम, भाऊ उपसरपंच होताच हेलिकॉप्टरने गावाला प्रदक्षिणा
देशातील चौथ्या क्रमांकाच्या रेल्वे डबे निर्मितीची घोषणा २०१८ मध्ये करण्यात आली. लातूर शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर ही कोच फॅक्टरी उभी राहिली असून, ती ३५० एकर क्षेत्रावर उभी करण्यात आली आहे. १२० एकरवर पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात दरमहा १६ कोच तयार केले जाणार आहेत. आता या प्रकल्पातून वंदे भारत रेल्वे तयार केली जाणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. सध्या रेल्वे कोच फॅक्टरीवर शेड, रेल्वे लाईन, कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, वीज वितरणाचे उपकेंद्र आदी कामे अंतिम टप्प्यात आहेत. २०२५ साली हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होईल. मात्र, याचा शुभारंभ डिसेंबर महिन्यात केंद्रीय रेल्वेमंत्री, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार असून याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होतील, असे लातूरचे खासदार तुकाराम श्रृंगारे यांनी सांगितले.