संगमनेर तालुक्यात महावितरणचा कारभार अतिशय ढिसाळपणे चालू आहे. महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी यांनी वेळेत आपल्या कामात सुधारणा करा, नाहीतर बदल्या करून घ्या. माझ्या मतदारसंघात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा महावितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आमदार अमोल खताळ यांनी दिला. तसेच यापुढे जर विजेचे रोहित्र जळाले तर ग्रामस्थांनी वर्गणी काढू नये तर तीन दिवसाच्या आत अधिकाऱ्यांनी वीज रोहित्र उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संगमनेर तालुक्यामध्ये वीज वितरणात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या पठार भागातील साकुर उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या साकुर, मांडवे, कर्जुले पठार, डोळसणे, घारगाव, खांबे या महावितरणच्या उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांची आढावा बैठक खताळ यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभाराविरोधातील तक्रारींचा पाढाच आमदार खताळ यांच्यासमोर मांडला.

यावेळी बाबासाहेब कुटे, बाळासाहेब खेमनर, बुवाजी खेमनर, लहानु खेमनर, रऊफ शेख, गुलाब भोसले, नितीन आहेर, संदीप खिलारी, अमृता कोळपकर, प्रियंका जाधव यांच्यासह महावितरणचे संगमनेर उपविभागाचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनायक इंगळे, उपकार्यकारी अभियंता प्रेमराज पाटील, साकुरचे उपअभियंता राजेश झा, घारगावचे उपअभियंता दीपक थोरात यांच्यासह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात आमदार खताळ यांच्याकडे तक्रारी केल्या. पठार भागातील साकुर व परिसरातील शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाही. सातत्याने येथे विजेचा लपंडाव सुरू असतो. यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करणे अवघड बनले आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. अशा तक्रारी ऐकल्यानंतर आमदार खताळ संतप्त झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यासाठी पाणी नव्हतं. आता इकडून तिकडून पाणी आलं तर वीज मिळत नाही. शेतातील पिके जळत आहेत. विजेबाबत शेतकऱ्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला तर ते साधे सौजन्याने बोलत देखील नाहीत. या मागे काय झाले ते सोडून द्या, परंतु आता येथून पुढे कोणत्याही कामात हलगर्जीपणा केलेला मी खपवून घेणार नाही. जर व्यवस्थित काम करावयाचे नसेल तर बदली करून घ्या.

महावितरण कंपनी ठेकेदार चालवत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आपण या कंपनीमध्ये जी ठेकेदारी चालू आहे, ती सर्वप्रथम बंद करा. येथून पुढे महावितरणवर ठेकेदाराचे नव्हे तर अधिकाऱ्यांचे वर्चस्व राहिले पाहिजे. पुढील कालावधीमध्ये जलसंपदामंत्री विखे पाटलांच्या माध्यमातून पठार भागाच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. हा पठार भाग सुजलाम सुफलाम करायचा आहे. या भागातील लोकांना पाणी आले पण विजेअभावी ते जर उचलता आले नाही तर आम्ही दुर्दैवी ठरू.

मतदारसंघांत अधिकाऱ्यांना जर कोणी आमचा कार्यकर्ता त्रास देत असेल तर मी अधिकाऱ्यांबरोबर राहील. परंतु सर्वसामान्य ग्राहकांना महावितरणचे अधिकारी व कर्मचारी त्रास देत असतील मी शेतकऱ्यांबरोबर आणि वीज ग्राहकांबरोबर राहील. जीर्ण झालेल्या विजेच्या तारा बदलल्या नसल्यामुळे त्या खाली लोंबकळत आहे. याबाबतचा प्रस्ताव माझ्याकडे द्या. आपण ऊर्जा मंत्र्यांना भेटून त्यावर उपाययोजना करू. संगमनेरच्या विकासासाठी इतर मतदार संघांपेक्षा निश्चितच निधी जास्त दिला जाईल, असा विश्वास आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी यांनी दिला असल्याचे खताळ म्हणाले. प्रास्ताविक रऊफ शेख यांनी केले तर आभार ॲड. अमित धुळगंड यांनी मानले.

अन्यथा कारवाई करणार….

मीटर रीडिंग संदर्भात ग्राहकांच्या तक्रारी आहेत. येथून पुढील काळात जर मीटर रिडींग होत नसेल आणि बिल चुकलं असेल तर ते तात्काळ दुरुस्त करून द्या. मीटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सी धारकांबरोबर वारंवार बैठका घेऊन त्यांना वेळच्यावेळी बिले घ्यायला लावले आहे. परंतु त्यांच्या कामात सुधारणा होत नसेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकरी ग्राहकांशी व्यवस्थित वागावे, नाहीतर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल.- अनिल थोरात, कार्यकारी अभियंता संगमनेर.