Amol Mitkari On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामधून काही नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे काहीजण नाराज आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते देखील नाराज आहेत. छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीर बोलून दाखवली आहे. एवढंच नाही तर छगन भुजबळांनी अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना, असं सूचक विधानही भुजबळांनी केलं होतं. तसेच त्यांनी आपल्या पुढील भूमिकेबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती.
याबरोबरच रविवारी माध्यमांशी बोलताना आपण आपली पुढील भूमिका लवकरच घेणार असल्याचंही छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. यानंतर आज (२३ डिसेंबर) छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळांनी जवळपास अर्धा तास फडणवीस यांच्याबरोबर चर्चा केली आहे. त्यामुळे या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी या भेटीवर भाष्य केलं आहे. “आम्हाला विश्वास आहे की ही कुठलीही राजकीय भेट नसावी. ही भेट फक्त राज्याच्या विकासाच्या पार्श्वभूमीवर असेल”, असं अमोल मिटकरी यांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.
हेही वाचा : अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
अमोल मिटकरी काय म्हणाले?
“देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. छगन भुजबळ हे जेष्ठ नेते आहेत. आम्हाला विश्वास आहे की ही कुठलीही राजकीय भेट नसावी. ही भेट फक्त राज्याच्या विकासाच्या पार्श्वभूमीवर असेल. आता छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन काय चर्चा केली? हे ते स्वत: सांगतील. मात्र, मला तरी असं वाटतं की छगन भुजबळ यांनी घेतलेली भेट ही फक्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांना कोणीही भेटू शकतं. त्या अनुषंगाने ही भेट घेतली असावी. पण या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? हे छगन भुजबळ हेच सांगू शकतील”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं.
नाराजीनंतर भुजबळांनी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचा अर्थ काय? यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “असं आहे की त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केलं होतं. याचा अर्थ असा आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील यामध्य हस्तक्षेप करु शकतात”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं.