|| संतोष मासोळे
निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी वेगळी चूल मांडणारे आमदार अनिल गोटे यांच्या पाठीशी भाजपमधील किती निष्ठावान आहेत, हे उघड होऊ लागल्याने आता भाजप प्रदेशाध्यक्ष आणि तिन्ही मंत्री अशा चौघांनीही महापालिका निवडणुकीत गोटेंना धडा शिकवण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपमध्ये गटबाजी किंवा बंडखोरी केल्यास पक्ष कोणत्या पद्धतीने निवडणुकीला सामोरा जाऊ शकतो, याचा धडा या निवडणुकीच्या निमित्ताने घालून देण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे.
विजयी संकल्प मेळाव्याचे निमंत्रण नाही, या एकाच कारणासाठी गोटे यांनी भाजपला धारेवर धरलेले नाही, तर गुंडांना आणि ज्यांनी भाजप नेत्यांना हिणविले, अशांना पक्षात प्रवेश दिल्याचा आरोप करून रान उठविले आहे. खरेतर भाजपने राज्यातील वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये इतर पक्षातील अनेकांना प्रवेश देण्याचे धोरण ठेवले. काहीही करून अधिकाधिक उमेदवार निवडून आणायचे आणि सत्ता मिळवायची हाच मुख्य उद्देश ठेवून भाजपचे नेते शक्ती पणाला लावत आहेत. या स्थितीत गोटेंच्या आरोपांना फारसे महत्व न देता भाजप नेत्यांनी याच निवडणुकीत विधानसभा निवडणुकीची पायाभरणी करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. भाजपने निवडणुकीची धुरा सोपविलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या मदतीने निवडणुकीची व्यूहरचना आखली आहे.
भाजपशी दोन हात करत निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या गोटे यांच्या कार्यपद्धतीतील विरोधाभास उजेडात येत आहे. भाजपचा कट्टर विरोधक असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘भ्रष्टवादी’ आहे, तर शिवसेना ही ‘राष्ट्रवादी सेना’ आहे, अशा शब्दांत गोटे यांनी दोन्ही पक्षांना सतत हिणविले. लोकसंग्रामच्या माध्यमातून राजकारण करताना तर त्यांनी कोणत्याही पक्षापेक्षा आपला लोकसंग्राम पक्ष कसा स्वच्छ आहे, याचे दाखले आवर्जून दिले. गोटे यांनी अनेकदा राष्ट्रवादीच्या कामकाजावर वारंवार आक्षेप घेतले. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शरसंधान साधले. भाजपशी बिनसल्यावर मात्र गोटे यांनीच राष्ट्रवादीशी अप्रत्यक्षपणे जुळवून घेण्याची भूमिका घेतली.
गोटे यांच्यातील अनपेक्षित बदल भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना अचंबित करणारा ठरला. गोटे यांची पक्षविरोधी भूमिका एवढी टोकाला गेली की त्यांनी कट्टर विरोधी पक्षांना नव्हे, तर मुख्य विरोधक म्हणून भाजपवरच नेम धरला आहे. जाहीर सभांमधून काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना नव्हे, तर केवळ भाजपवर टीका करण्यासाठी त्यांनी जास्त वेळ दिला. गोटे यांच्या स्वभावाची धुळेकरांना जाणीव आहे. त्यांच्या राजकीय डावपेचांची कल्पना सहजासहजी कोणाला येत नाही. यामुळे गोटे हे कायम संशयाच्या भोवऱ्यात असतात.
गोटेंच्या नेतृत्वाखाली काम करता येते, पण त्यांच्याबरोबर राहून अपेक्षित राजकीय उंची गाठता येत नाही, याचा अनेकांनी अनुभव घेतला आहे. अशी अवस्था झालेले अनेक जण आज ना गोटेंचे राहिले, ना कोणत्याही राजकीय पक्षाचे. गोटे यांच्या प्रचाराचा रोख भाजपविरोधात आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी अनेकांची ‘मोट’ बांधली आहे.
एकाच वेळी विरोधी पक्ष आणि गोटेंचा ‘स्वाभिमानी भाजप’ यांच्याशी लढावे लागणार असल्याने भाजप नेते जाहीर सभांमधून गोटेंना लक्ष्य करत आहेत. ‘धुळ्यात गुन्हेगारी वाढल्याचे म्हणणाऱ्या गोटे यांनी विधानसभेत या संदर्भात आवाज उठवून ती मोडून काढण्यासाठी कधी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. सराईत गुन्हेगारांची यादी मागवून त्यांच्या तडीपारीची मागणी केली नाही,’ असे एक ना अनेक मुद्दे काढून भाजपनेतेगोटे यांच्या विरोधात रान उठवत आहेत. केंद्रासह राज्यात सत्ता असणाऱ्या भाजपकडे नेते-कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. गोटेंच्या बंडखोरीमुळे भाजपमध्ये काही अंशी फूट पडली असली तरी संपूर्ण ताकद लावून भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. पक्षाविरोधात कोणी भूमिका घेतल्यास त्याची काय अवस्था होईल हे दाखविण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न आहे.
गोटे यांचे प्रस्थ मोडून काढण्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भर दिला आहे. गोटे भाजपवर गुन्हेगारीचा आरोप करतात. तसेच पक्षाच्या नेत्यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करतात. काहीही करून सहानुभूती निर्माण करण्याचा गोटे यांचा प्रयत्न आहे. गोटे हे गुन्हेगारीच्या विरोधात बोलत असले तरी स्वत: गोटे यांना मुद्रांक घोटाळ्यात ‘मोक्का’नुसार अटक करण्यात आली होती, असे भाजपचे नेते सांगत आहेत.
विधानसभा निवडणुकीची तयारी
अनिल गोटेंच्या आरोपांना फारसे महत्त्व न देता भाजप नेत्यांनी धुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. निवडणुकीची धुरा सोपविलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या मदतीने निवडणुकीची व्यूहरचना केली आहे.