विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी आमदार विजय औटी यांची सोमवारी निवड करण्यात आली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सोमवारपासून प्रारंभ झाला. त्या वेळी तालिका अध्यक्ष म्हणून आ. औटी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत औटी हे तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार आहेत.
यापूर्वी आ.औटी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला २६ फेब्रुवारी रोजी त्यांना काही काळासाठी तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहण्याची प्रथमच संधी मिळाली होती. औटी यांना हा बहुमान मिळाल्याबददल अनेकांनी त्या वेळी वाढदिवसाच्या शुभेच्छांबरोबरच त्यांचे अभिनंदनही केले होते. सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर संपूर्ण कालावधीसाठी औटी यांची पुन्हा तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. विधानसभेच्या सभापतींच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज पाहण्याची जबाबदारी तालिका अध्यक्षावर असते. प्रत्येक पक्षाकडून विधानसभेतील अभ्यासू आमदाराची त्यासाठी निवड केली जाते. आ. औटी यांनी गेल्या साडेनऊवर्षांच्या कालावधीत विधानसभेत लक्षवेधी कामगिरी केल्याची दखल घेऊन शिवसेनेच्या पक्षनेतृत्वाने आ. औटी यांच्या नावास प्रथम पसंती देउन त्यांच्यावर तालिका अध्यक्षपदची जबाबदारी सोपविली.
आतापर्यंत विधानसभेत पारनेर मतदारसंघाचे नेतृत्व करणा-या आमदारास प्रथमच अशाप्रकारचा बहुमान मिळाला आहे. विरोधी पक्षात असूनही अनेक योजनांसाठी निधी खेचून आणण्याची किमया औटी यांनी केली आहे.