राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बबनराव पाचपुते यांच्या पक्ष सोडण्याची केवळ औपचारिकताच बाकी आहे. उद्या (शुक्रवार) बहुधा पक्ष सोडण्याचाच निर्णय ते जाहीर करतील असे सांगितले जाते. मात्र पक्ष सोडल्यानंतर ते भारतीय जनता पक्षात जाणार, की अपक्ष निवडणुकीची मोर्चेबांधणी करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
पाचपुते यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीच थेट वितुष्ट आले आहे. ते व पालकमंत्री मधुकर पिचड यांच्याविषयी स्पष्ट शब्दांत व उघडपणे नाराजी व्यक्त करून पाचपुते यांनी पुढची दिशा काहीशी स्पष्ट केली आहे. उद्या (शुक्रवार) त्यांनी समर्थकांचा मेळावा आयोजित केला असून, या मेळाव्यातच ते नव्या राजकीय प्रवासाची घोषणा करतील. कार्यकर्ते काय भूमिका घेतात, यावरच पुढची दिशा ठरेल असे त्यांच्या गोटातून सांगण्यात येत असले तरी एव्हाना राष्ट्रवादीतून बाहेर पडायचे या निर्णयाप्रत ते आल्याचे सांगण्यात येते. त्याचीही पक्षश्रेष्ठींनी फारशी दखल न घेतल्यानेच त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करताना अजित पवार व पिचड यांच्यावर थेट तोफ डागली आहे. पाचपुते राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीतही आहेत. या समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीचे त्यांना आमंत्रणही होते, मात्र ते अव्हेरून बैठकीला ते अनुपस्थितच राहिले.
मंत्रिपद गेल्यापासून पाचपुते यांची राष्ट्रवादीत घुसमट सुरू आहे. ते आणि पिचड यांच्यामध्ये गेल्या पाच वर्षांपासून शीतयुद्ध सुरू आहे. गेल्या निवडणुकीनंतर नेमके पिचड यांचेच आदिवासी खाते पाचपुते यांना मिळाल्यामुळे हा संघर्ष सुरू झाला होता. पाचपुते यांचे मंत्रिपद काढून ते पिचड यांना देण्यात आल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. हीच पाचपुते यांची पक्ष सोडण्याची नांदी ठरली आहे. मात्र ते भाजपत जाणार की स्वतंत्ररीत्या विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करणार, याकडे जिल्हय़ाचे लक्ष लागले आहे. श्रीगोंदे तालुक्यात भाजपच्या उमेदवारीसाठी इतरही अनेक जण इच्छुक आहेत. पाचपुते यांच्या भूमिकेमुळे तेही अस्वस्थ झाले आहेत. पाचपुते यांनी मात्र हा निर्णय सर्वस्वी समर्थकांवर सोपवल्याचे त्यांच्या गोटातून सांगण्यात येते.
राष्ट्रवादीचा उमेदवार कोण?
पाचपुते यांच्या आधी त्यांचेच स्थानिक प्रतिस्पर्धी तथा पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडले. गेल्या काही वर्षांपासून या दोघांमध्ये विधानसभा उमेदवारीसाठी चुरस होती. त्यांच्यानंतर पाचपुते हेही पक्षातून बाहेर पडले, तर राष्ट्रवादीसमोर उमेदवाराचाच प्रश्न निर्माण होणार आहे. त्यांना तुल्यबळ उमेदवार मिळणेही मुश्कील असून ते लक्षात घेऊनच राष्ट्रवादी ही जागाच काँग्रेसला सोडून देईल, अशीही एक शक्यता व्यक्त होते.
बबनराव पाचपुते यांच्या कार्यक्रमाला मंत्र्यांची दांडी
आज श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी व श्रीगोंदे येथे आमदार बबनराव पाचपुते यांनी नळपाणी पुरवठा योजनांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्याच्या जाहिरातीही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केल्या. या जाहिरातीमध्ये शरद पवार, अजित पवार, राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री उदय सावंत व सुरेश धस यांचे फोटो छापले. त्यांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट घातला, मोठा गाजावाजा व खर्च केला, मात्र या दोन्ही कार्यक्रमांना या मंत्र्यांनी दांडी मारली.
आमदार बबनराव पाचपुते हे राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच रामराम ठोकणार अशी चर्चा सध्या जोरात असतानाच व आज हे दोन कार्यक्रम होते. आपण नाराज असलो तरीही आजही पक्षाबरोबर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न पाचपुते यांनी केला, मात्र उदय सावंत व सुरेश धस हे दोन्ही मंत्री अजित पवार यांचे समर्थक आहेत, त्यामुळे ते कार्यक्रमाला येणार काय याबाबत श्रीगोंदे तालुक्यात उत्सुकता होती, मात्र त्यांनी अपेक्षेप्रमाणे या कार्यक्रमाकडे बैठकीचे निमित्त सांगून पाठ फिरवली.
या कार्यक्रमाच्या वेळी पाचपुते यांनी आपणास राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही जणांनी मागील दीड वर्षांपासून फार त्रास दिला. आजपर्यंत हे सर्व सहन केले, मात्र आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे अशी जाहीर वाच्यता त्यांनी केली. या वेळी बाबासाहेब भोस, विठ्ठलराव काकडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Story img Loader