जळगावातल्या एका सभेत बोलत असताना बच्चू कडू यांची जीभ घसरली आणि त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. मात्र नंतर चूक लक्षात येताच याच वक्तव्याबाबत माफीही मागितली. जळगावातल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मी आमदार होणार की नाही? याची मला पर्वा नाही. मात्र शेतकऱ्यांची पर्वा असणारा आपला पक्ष आहे असं आमदार बच्चू कडू बोलले. त्यानंतर आज काल तृतीयपंथीयही आमदार होतात असं वक्तव्य त्यांनी केलं. जळगावातल्या शेतकरी संवाद मेळाव्यात हे वक्तव्य त्यांनी रविवारी केलं. याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आता माफी मागितली आहे.
आमदार बच्चू कडू यांनी रविवारी जळगाव जिल्ह्यात झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी संवाद मेळाव्यात भाषण केलं. त्यावेळी ज्याच्या बोलण्यात दम नसतो, ज्याच्या ओठावर मिशी नसते, चालतो तेव्हा बाई आहे की माणूस ते पण कळत नाही, असे लोकही आमदार होतात. तृतीयपंथीयही आमदार होतात असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आपण काय बोलून गेलो ही चूक त्यांच्या लक्षात आली.
मेळाव्यातल्या भाषणात आपण जे बोललो ते चुकीचं होतं हे लक्षात आल्यानंतर बच्चू कडू यांनी या वक्तव्याबाबत माफी मागत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आंडू-पांडू लोक आमदार होतात असं मला म्हणायचं होतं मी चुकीचा शब्द बोलून गेलो त्याबद्दल माफी मागतो असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.
जळगावातील सावदा इथे काँग्रेसच्या रॅलीत एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली होती. या घटनेचाही बच्चू कडू यांनी कडक शब्दात समाचार घेतला. कॉलेज आणि शाळांमधील मुलांचा वापर पक्षाच्या कामासाठी होता कामा नये. एखादी संस्था असं करत असेल तर अशा संस्था बंद केल्या पाहिजेत, अशा पद्धतीचा प्रकार प्रहार जनशक्ती खपवून घेणार नाही, संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशीही मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.