अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो असं म्हणत आमदार रवी राणा यांनी आज पत्रकार परिषद घेत पराभवाचं विश्लेषण करणार असल्याचं सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी प्रहारचे नेते, आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले. “बच्चू कडू हे वसुलीबाज असल्याचं म्हणत त्यांना मातोश्रीवरून रसद पुरवण्यात आली”, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला. त्यांच्या या आरोपाला आता बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर देत रवी राणा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “नवनीत राणा यांच्या पराभवाचा कट हा युवा स्वाभिमानी पक्षाचा असून नवनीत राणा यांनी रवी राणा यांना सुनावलं असेल त्यामुळे ते आता माझ्यावर टीका करत आहेत”, अशा खोचक शब्दांत टीका करत बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
बच्चू कडू काय म्हणाले?
“नवनीत राणा या गेल्यावेळी अपक्ष म्हणून खासदारकीला निवडून आल्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. मात्र, निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्या विसरल्या. आज रवी राणांनी माझ्यावर आरोप केले. पण हे आरोप करत असताना त्यांची तारांबळ उडाली. मला वाटतं नवनीत राणांनी त्यांना झापलं असेल. त्यामुळे ते आता माझ्यावर बोलतात. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत रवी राणांनी तब्बल १०८ वेळा माझं (बच्चू कडू) नाव घेतलं. त्यामुळे त्यांना आता मानसोपचार तज्ञाकडे पाठवण्याची गरज आहे. त्यांना जरा जास्त झोंबलेलं दिसतं आहे”, असा टोलाही बच्चू कडू यांनी रवी राणा यांना लगावला.
हेही वाचा : “नवनीत राणांच्या पराभवासाठी…”, रवी राणांचा गंभीर आरोप; म्हणाले, “बच्चू कडू यांना मातोश्रीवरून…”
रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका करताना डिपॉजिट जप्त झाल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला चारवेळा निवडून दिलं. रवी राणा यांच्यासारखा कोणाचा पाठिंबा घेऊन निवडून आलो नाही. मी स्वत:च्या बळावर निवडून आलो. माझ्यावर लोकांनी विश्वास ठेवला मग मी निवडून आलो. राणांनी आधी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला आणि आता भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा घेतला. जर तुमच्यात हिंमत असेल तर बिना पाठिंब्याची निवडणूक लढवा”, असं आव्हान बच्चू कडू यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांना दिलं.
नवणीत राणांचा पराभव स्वाभीमानी पक्षामुळे
बच्चू कडू पुढं म्हणाले, “खरं तर नवनीत राणा यांच्या पराभवाचा कट हा युवा स्वाभीमानी पक्षाचा आहे. नवनीत राणा जेव्हा खासदार होत्या, तेव्हा रवी राणा हे कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे अंतर्गत कलहामुळे त्यांचा पराभव झाला. आमचा काहीही वाद नाही. रवी राणा यांनी फक्त तोंड सांभाळलं असतं तरी नवनीत राणा निवडून आल्या असत्या”, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. तसेच मातोश्रीवरून रसद पुरवल्याच्या आरोपावर बोलाताना या विरोधात दोन दिवसांत न्यायालयात जाणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.