आमदार बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयाला अचानक भेट देत आरोग्य अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. सरकारी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून बच्चू कडू चांगलेच संतापले. यानंतर त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकाची कानउघडणी केली. या सरकारी रुग्णालयाच्या अनेक वार्डमध्ये एका बेडवर २ रुग्ण झोपलेले दिसल्याने बच्चू कडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे ऐन उन्हाळ्यातही रुग्णालयातील कुलर बंद होते, पाण्याचं मशीनही बंद होतं. रुग्णालयाच्या आपतकालीन कक्षाबाहेर खड्डे असल्याचे दिसले. यानंतर बच्चू कडूंनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना फोनवरून खंडसावलं.
बच्चू कडू म्हणाले, “रुग्णालयाविषयी अनेक तक्रारी होत्या. कार्यकर्त्यांनीही याबाबत माहिती दिली होती. करोनानंतर सरकारने आरोग्याकडे जास्त द्यायला पाहिजे होतं. आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचं वाटतं. आरोग्यासाठी असलेली आर्थिक संकल्पातील तरतूद आणि येथील दुरावस्था याचा एकदा आढावा घेणं फार गरजेचं आहे.”
“लोकांची खासगी रुग्णालयात फसवणूक होते”
“मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिणार आहे. यासा खास उपक्रम राबवण्याची मागणी करणार आहे. कारण हे सगळं गरीबांशी संबंधित आहे. आपल्याकडे आरोग्याच्या योजना चांगल्या आहेत, पण सरासरी लोकांची खासगी रुग्णालयात गेले तर तिथेही फसवणूक होते, योजनेत बसत नाहीत आणि शेवटी त्यांना सरकारी रुग्णालयात यावं लागतं,” असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
“सर्वच सरकारी रुग्णालयात प्रचंड अस्वच्छता”
बच्चू कडू पुढे म्हणाले, “या रुग्णालयात सर्वात मोठी अडचण आरोग्य सेवा देण्याची आहे. डॉक्टरांची संख्या कमी आहे. दुसरा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रुग्णालयातील अस्वच्छता आहे. रुग्णालयं स्वच्छ रहावीत यासाठी राज्यस्तरावर नियोजन होणं गरजेचं आहे. ही अवस्था फक्त या रुग्णालयातील नसून सर्वच सरकारी रुग्णालयातील अवस्था आहे.”
हेही वाचा : VIDEO: भाजपाच्या मित्रपक्षांमधील वाद उघड, अमरावती लोकसभा मतदारसंघावरून बच्चू कडू म्हणाले…
“देशात आरोग्य आणि शिक्षण सैन्याच्या ताब्यात दिले पाहिजे”
“राज्यात आणि देशात आरोग्य आणि शिक्षण हे क्षेत्र सैन्याच्या ताब्यात दिले पाहिजे. एखाद्या ब्रिगेडियरला इथं नेमलं पाहिजे. तोपर्यंत आम्ही येऊ, तात्पुरती दुरुस्ती होईल आणि बोंबाबोंब तशीच राहणार आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,” असंही बच्चू कडूंनी नमूद केलं.