Bachchu Kadu : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी राज्यभरात दौरा करत मतदारसंघाचा आढावा घेत सभा, मेळाव्याच्या माध्यमातून निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या दौऱ्यांच्या माध्यमातून उमेदवारांची चाचपणी देखील केली जात आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीला राज्यात फक्त १८ जागा जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे महायुतीने आता विधानसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र, असे असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीत नेमकी काय झालं? आणि शिवसेना शिंदे गटाच्या जागांवर उमेदवार देताना भारतीय जनता पक्षाने हस्तक्षेप केल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. “मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे आणि उमेदवार ठरवतं भाजपा, आणि हाच हस्तक्षेप मारक ठरला”, असा गंभीर आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा : “संजय गायकवाडच्या तोंडाला आवर घाला नाहीतर…”, नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

बच्चू कडू काय म्हणाले?

“लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात नवनीत राणा निवडून येणार नाही, हे सर्व्हेमध्ये स्पष्ट होतं. मात्र, असं असतानाही भारतीय जनता पक्षाने विरोध असतानाही नवनीत राणा यांना तिकीट देतं आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला भाजपा म्हणतं की तुमचा सर्व्हे बरोबर नाही, म्हणजे मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे आणि उमेदवार ठरवतं भाजपा. हा जो काही हस्तक्षेप आहे, हाच हस्तक्षेप खरं तर मारक ठरलेला आहे”, असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.

…तर अजित पवार देखील तिकडे दिसू शकतात

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर बोलताना मोठा दावा केला आहे. बच्चू कडू यांनी म्हटलं की, “आगामी काळात अजित पवार गटाचे अर्ध्याहून आधिक आमदार हे शरद पवार गटात जातील. काही दिवसांनी अजित पवार देखील तिकडे दिसू शकतात. त्यांना कुणीही अडवलेलं नाही. शेवटी हे राजकारण आहे. कधी कुणाच्या पारड्यात जाऊन बसायचं किंवा कुणाबरोबर राहायचं, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे”, असं मोठं विधान बच्चू कडू यांनी केलं.

…म्हणून श्रेयवादाची लढाई

राज्यात महायुती सरकारमध्ये लाडकी बहीण योजनेवरून श्रेयावादाची लढाई सुरु असल्याचं बोललं जातं. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे श्रेयवादाची लढाई होणारच, ते संयुक्तीक आहे. भाजपा म्हणतंय की लाडकी बहीण योजना आम्ही आणली, शिंदे गटाचे नेते म्हणतात की ही योजना आम्ही आणली. अजित पवार यांचा पक्षही म्हणतो की ती योजना आम्ही आणली. पण ही लाडकी बहीण योजना कुणी आणली, हे त्यानांच ठरवायचं आहे”, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla bachchu kadu on shiv sena shinde group bjp mahayuti politics navneet kaur rana amravati constituency gkt