प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि अमरावतीतल्या अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीत अमरावतीची जागा आपल्या पक्षाला मिळावी अशी मागणी केली आहे. बच्चू कडू भाजपा आणि शिंदे गटाकडे एक लोकसभेची जागा (अमरावती) आणि १५ ते २० विधानसभेच्या जागा मागणार आहे. तशी आपण तयारी केली असल्याचं कडू यांनी सांगितलं. कडू यांच्या वक्तव्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर सर्वात आधी प्रतिक्रिया आली ती म्हणजे अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत कौर यांचे पती आणि अमरावतीमधील बडनेराचे आमदार रवी राणा यांची. राणा म्हणाले, “देवेंद्र फडणवीस आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे कोण कुठली जागा मागतंय आणि कुणाला कुठली जागा द्यायची याबाबतचा निर्णय नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस घेतील. कोणी कितीही दावे केले तरी ते खोडून काढण्याची ताकद रवी राणामध्ये आहे.”
रवी राणांच्या वक्तव्यावर आता बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमदार बच्चू कडू टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. आमदार कडू म्हणाले, अमरावती लोकसभा लढवण्याची आमची बऱ्यापैकी तयारी आहे. मी स्वतः या मतदारसंघातून लढलो आहे. मला या जिल्ह्याचा कानाकोपरा माहिती आहे. मी जेव्हा येथून निवडणूक लढलो होतो तेव्हा जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर लोकसभा निवडणूक प्रहारच्या बॅनरखाली आम्ही लढवणार आहोत. युतीत झालं तर ठीक आहे नाहीतर प्रहार स्वतंत्र लढेल.
हे ही वाचा >> “भाजपाच्या सर्वेनुसार शिंदे गटातला एकही खासदार…”, चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा; म्हणाले, “गजानन कीर्तिकरांना समजलंय…”
दरम्यान, बच्चू कडू यांना यावेळी विचारण्यात आलं की, नुकतीच रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, अमरावती लोकसभेवरचा दावा आम्ही खोडून काढू. तसेच स्वतः बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ नवनीत राणांच्या प्रचाराला येतील आणि परिस्थिती बदलेल. यावर आमदार बच्चू कडू म्हणाले, कोणाचं भाकित खरं ठरेल ते वेळच ठरवेल.