राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठी चर्चा आणि वाद पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची आग्रही मागणी आणि राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलेलं असताना छगन भुजबळांनीही ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं जाऊ नये, यावर आक्रमक भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असताना आमदार बच्चू कडूंच्या विधानाची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
काय म्हणाले बच्चू कडू?
आमदार बच्चू कडूंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. “सरकार व जरांगे पाटील यांच्यातला समन्वय अधिक चांगला राहण्याची गरज आहे. जरांगे पाटलांचा फोन आल्यानंतर मी मध्यस्थाची जबाबदारी स्वीकारली होती. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. इथे सगळे एकोप्यानं राहिले आहेत. धर्म वा जातीच्या नावानं महाराष्ट्रात कुठेही अशांतता माजू नये. त्यामुळे भुजबळ व जरांगेंनी मुद्द्यांवर भांडावं पण व्यक्तिगत टीका-टिप्पणी होऊ नये”, असं बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, अजित पवारांनी आपल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य न करण्यास सांगितल्याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारणा केली. त्यावर बोलताना बच्चू कडूंनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. “अजित पवारांचं बरोबरच आहे. प्रत्येक पक्षाची आपापली भूमिका असते. नेते भांडतात, पण खालच्या कार्यकर्त्याचं, समाजातल्या शेवटच्या माणसाचं मरण असतं. आम्ही पोळी शेकायला तयारच असतो. आम्हा राजकीय लोकांची जातच तशी आहे. मग तो कुठल्याही जातीचा असो. जिथे तवा तापलेला असतो, तिथे किटली ठेवायचं आमचं कामच आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
बागेश्वर बाबा-फडणवीस भेटीवर टोला
यावेळी बोलताना बच्चू कडूंनी देवेंद्र फडणवीस-बागेश्वर बाबा भेटीवर टोला लगावला आहे. “देवेंद्र फडणवीसांना बागेश्वर बाबा महत्त्वाचे वाटले असणार. आजकाल आपण ज्या लोकांना मानतो त्यांच्यातही वाद आहेत. नेत्यांमध्ये, समाजात, कार्यकर्त्यांमध्ये वाद चालू आहे. हा महाराष्ट्र मला वेगळ्याच वळणावर जातोय की काय असं वाटू लागलं आहे. महाराष्ट्रानं देशाला, जगाला विचार दिले. पण साईबाबांच्या भूमीत त्यांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर महाराजांप्रती देवेंद्र फडणवीसांच्या आस्था अधिक असू शकतात. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे”, अशा शब्दांत बच्चू कडूंनी फडणवीसांना टोला लगावला आहे.