पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगलेला घोषणाबाजीचा कलगीतुरा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे विरोधकांनी ‘५० खोके, एकदम ओके’च्या घोषणा देत सत्ताधाऱ्यांना डिवचलं, तर सत्ताधाऱ्यांनीही ‘आदित्य ठाकरेंची ‘दिशा’ चुकली’, ‘लवासाचे खोके, बारामती ओके’ अशा प्रकारच्या घोषणा देत विरोधकांना लक्ष्य केलं. यासंदर्भात आता दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतलं आहे. तसेच, ‘५० खोके’ घोषणेवरून विरोधकांना खुलं आव्हान देखील दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“काही लोक सभागृहात बोलत नाहीत आणि बाहेर..”

विधानभवनात अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यात झालेल्या बाचाबाचीवरून बच्चू कडूंनी खोचक शब्दांत टीका केली आहे. अमोल मिटकरींना लक्ष्य करत बच्चू कडू म्हणाले, “मला तर वाटतं की काही लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत आणि पायरीवर येऊन जोरजोरात बोंबलतात. पायऱ्यांवर कुणी बोललं आणि बॅनर छापले की त्याची ब्रेकिंग होते”.

बाचाबाची झाली तेव्हा नेमकं काय घडलं? बच्चू कडू म्हणतात..

दरम्यान, दोन्ही गटांमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर बाचाबाची झाली, तेव्हा नेमकं काय घडलं, यावर बच्चू कडूंनी भूमिका मांडली आहे. “आधी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली होती. ते सुरू असताना राष्ट्रवादीचे आमदार तिथे अचानक आले. वास्तविक त्या पायऱ्यांवर कुणी आधीपासून नारेबाजी करत असेल, तर दुसऱ्याने जाऊ नये असा प्रघात आहे. पण असं असताना जाणीवपूर्वक राष्ट्रवादीचे आमदार मागे उभे न राहाता गोल उभे राहिले. म्हणजे आधी त्यांनी चूक केली. उलट म्हणायला लागले की सत्ताधाऱ्यांना माज आला”, असं बच्चू कडू म्हणाले.

राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड, शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती; उद्धव ठाकरे म्हणतात…!

“५० खोके, एकदम ओके वगैरे घोषणा त्यांनी केल्या. तुम्हाला जर ५० खोके दिले असं वाटत असेल, तर कारवाई करा. असं नामर्दांसारखं वक्तव्य का करत आहात? मर्दानगी असेल, तर समोर या आणि पुरावे द्या”, असं आव्हान बच्चू कडूंनी विरोधकांना दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla bachchu kadu slams shivsena ncp amol mitkari targeting eknath shinde group pmw