मोहन अटाळकर
अमरावती: जिल्हा परिषदेच्या सभेदरम्यान गट विकास अधिकाऱ्याच्या दिशेने माईक आणि पाण्याच्या बाटल्या भिरकावल्याच्या प्रकरणात मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना जिल्हा न्यायालयाने तीन महिने साधा कारावास आणि १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
देवेंद्र भुयार हे जिल्हा परिषदेचे सदस्य असतानाची ही घटना आहे. पाणीटंचाईच्या प्रश्नावर २८ मे २०१९ रोजी जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत वरूड तालुक्यातील पाणीटंचाई विषयी गटविकास अधिकारी सुभाष बोपटे माहिती देत होते. दरम्यान एका मुद्यावरून भुयार आणि बोपटे यांच्यात चकमक उडाली. यावर संतप्त होत भुयार यांनी बोपटे यांच्या दिशेने माईक आणि पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या.
या प्रकारानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे देवेंद्र भुयार यांच्या विरोधात गाडगेनगर पोलीस ठाण्यात भादंवि ३५३, १८६ व ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. रणजीत भेटाळू यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. एकही साक्षीदार फितूर झाला नाही. फिर्यादी तसेच गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.
गुन्हा सिद्ध झाल्याने देवेंद्र भुयार यांना न्यायाधीश एस.एस. अडकर यांनी तीन महिने साधा कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील रणजीत भेटाळू यांनी युक्तिवाद केला. अन्य एका प्रकरणात २०१३ मध्ये वरूडच्या तत्कालीन तहसीलदारांना शिवीगाळ, मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने देवेंद्र भुयार यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तीन महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती, हे येथे उल्लेखनीय.