गेल्या वर्षी शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर ठाकरे गटात फूट पडली आणि उद्धव ठाकरे सरकार कोसळलं. यावेळी घडलेल्या घडामोडींमध्ये दोन्ही गटांनी एकमेकांच्या आमदारांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावली असून कारवाईची मागणी केली आहे. दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर आजपासून सुनावणी सुरू झाली. यासंदर्भात दाखल याचिकांपैकी याचिका क्रमांक एकवर आज सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी नेमकं काय घडलं यासंदर्भात शिंदे गटाच्या वकिलांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
नेमकं काय घडलं विधानभवनात?
विधानभवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर या प्रकरणांची सुनावणी केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार ही सुनावणी केली जात आहे. यावर आज झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांना एकमेकांना याचिकेशी संबंधित कागदपत्र सोपवण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आल्याचं शिंदे गटाचे वकील अनिल सिंह यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
“आज सुनावणीची पहिली तारीख होती. सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या पहिल्या याचिकेवर सुनावणी चालू झाली. व्हीप न पाळल्यामुळे अपात्रतेची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. आमच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला की सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या याचिकेच्या प्रती आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात. प्रभूंनी याचिका केली होती की सगळ्या प्रकरणांची सुनावणी एकत्र घेतली जावी. अध्यक्षांनी दोन्ही पक्षांना आदेश दिले आहेत की त्यांनी त्यांचे कागदपत्र एकमेकांना द्यावेत. यानंतर पुढची तारीख दिली जाईल. तेव्हा ठरेल की नेमकी सुनावणी कशा पद्धतीने होईल. कागदपत्र सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे”, असं अनिल सिंग यांनी यावेळी सांगितलं.
इतर प्रकरणांचं काय?
दरम्यान, या पहिल्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांना दोन आठवड्यांची मुदत दिली असली, तरी इतर याचिकांवर अजूनही विधानभवनात सुनावणी चालू असल्याची माहिती अनिल सिंग यांनी पत्रकारांना दिली आहे. दरम्यान, एकीकडे राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी चालू असली, तरी दोन्ही गटांकडून आपल्याच बाजूने निर्णय होईल असा दावा केला जात आहे.