राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू असून ते आता अखेरच्या टप्प्यात आले आहे. आज अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. आजच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. यादरम्यान, विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी अर्थसंकल्पातील एकूणच चर्चेवर टीका केली. राज्यात इतर महत्त्वाचे प्रश्न असताना औरंगजेब आणि कामराप्रकरणी चर्चा झाल्याने त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. तसंच, राज्यात ४२ मंत्री असतानाही सभागृहात केवळ दोनच मंत्री सहभागी असल्याने संतापही व्यक्त केला.
अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू करतानाच एकनाथ खडसे म्हणाले, “अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात प्रस्तावावर आज चर्चा आहे. हा महत्त्वाचा प्रस्ताव म्हटला जातो. अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. आठवड्यामधील शेवटचा प्रस्ताव आहे. या महत्त्वाच्या प्रस्तावावेळी चर्चा सुरू असताना सभागृहात एकही मंत्री हजर नाही. शंभूराज देसाई धावतपळत आले, याबद्दल मी अभिनंदन करतो. सरकार किती संवेदनशील आहे, याचा अनुभव आम्ही घेतोय. या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये सारेच विषय असतात, त्यामुळे सर्वसाधारण काही मंत्री तरी उपस्थित राहावे अशी अपेक्षा आहे. पण माहित आहे तुम्हाला खूप काम आहे, रात्रीचं खूप जागरण होतंय आणि जागरणामुळे सकाळी उठायला खूप उशीर होतोय. ब्रिफिंग तुम्हालाच असतं का? आम्हाला नसतात का कामं?” असा सवालही त्यांना विचारला.
एकनाथ खडसे संतापलेले पाहून शंभूराज देसाई म्हणाले, विभागातून माहिती मिळवण्यासाठी वेळ होतो. मी वेळेत आलो होतो, लिफ्टमुळे वेळ झाल्याने दोन सेकंद उशीर झाला, असं स्पष्टीकरण शंभुराज देसाईंनी दिलं आहे.
यावर एकनाथ खडसे म्हणाले, सर्व मंत्र्यांचं ब्रिफिंग नसतं. मीही काही काळ मंत्री राहिलो आहे. मीही १५ वर्षे मंत्री होतो. पण जाऊद्या. सरकार किती असंवेदनशील आहे, याचं हे उदाहरण दिसतंय.”
घोटाळे होतात, पण मुख्यमंत्र्यांना कळत नाही
“राज्य एकाबाजूला आर्थिक दिवाळखोरीत आहे, असं असतानाही राज्यातील आर्थिक घोटाळे थांबलेले नाहीत. परिवहन विभाग, आरोग्य खातं, विविध खात्यांमध्ये मोठे घोटाळे झाले आहेत. हे घोटाळ्यांचं सरकार आहे. ३२ हजार कोटींचे घोटाळे होतात आणि मुख्यमंत्र्यांना त्याचं ज्ञान असतं हे राज्याचं दुर्दैवं आहे”, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.