विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात सध्या घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते विविध मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. तसेच उमेदवारांची चाचपणी करत असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपासंदर्भात खलबतं सुरु आहेत. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे.

याचं कारण विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे काही आमदार फुटल्याचं बोललं जात आहे. असं असतानाच आता काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी आपल्याच पक्षाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. “निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही तर स्थानिक कार्यकर्ते निर्णय घेतील”, असा इशारा हिरामण खोसकर यांनी दिला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हेही वाचा : रक्षाबंधनाच्या दिवशी खात्यात जमा होणार ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे? अजित पवारांनी नेमकं काय सांगितलं?

हिरामण खोसकर काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट का घेतली? यावर बोलताना आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितलं की, “नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्यावर स्थानिकांची दुकाने आहेत. तेथे स्थानिकांनी व्यवसाय सुरु केला आहे. पण अधिकाऱ्यांकडून त्या दुकानदारांना अतिक्रमण आहे म्हणून नोटीसा देण्यात येत आहेत. मात्र, त्यांची दुकाने अतिक्रमणामध्ये नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. आमच्या वरिष्ठ नेत्यांना या प्रश्नासंदर्भात न सांगण्याचं कारण म्हणजे आमचे वरिष्ठ सत्तेत नाहीत. त्यामुळे जे सत्तेत आहेत तेच हा प्रश्न सोडवू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत त्यांना लोकांच्या अडचणी सांगितल्या आहेत”, असं हिरामण खोसकर यांनी सांगितलं.

काँग्रेस पक्ष सोडणार का?

आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे खोसकर पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं. या संदर्भात बोलताना आमदार हिरामण खोसकर म्हणाले, “मी पक्ष बदलणार नाही. मी काँग्रेस पक्षाचीच उमेदवारी घेणार आहे. मात्र, काँग्रेसची उमेदवारी मला मिळाली नाही तर स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निर्णय घेतील. आता कोणतीही उमेदवारी घेतली तरी निवडून आणणारे स्थानिक लोक आणि कार्यकर्ते असतात. त्यामुळे त्यांचा निर्णय महत्वाचा असतो”, असं सूचक विधान काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी केलं.

काही आमदार नाराज

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत बोलताना काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी काही दिवसांपूर्वी मोठं विधान केलं होतं. “नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत”, असं विधान हिरामण खोसकर यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी काँग्रेसला पुन्हा एकदा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.