विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन उमेदवार निवडणुकीत उभे केले होते. मात्र, तीन पैकी दोन उमेदवारांचा विजय झाला तर एका उमेदवाराचा पराभव झाला. विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची जवळपास ७ मतं फुटल्याचं चर्चा आहे. काही आमदारांनी क्रॉस व्होटींग केलं असून या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत बोलताना काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी मोठं विधान केलं आहे. “नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत”, असं विधान हिरामण खोसकर यांनी केलं आहे. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिरामण खोसकर काय म्हणाले?

“विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी एक दिवस हॉटेलमध्ये आमची सर्वांची चर्चा झाली होती. यावेळी कोणाला मतदान द्यायचं? हे ठरलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता उपस्थित राहायचं असं ठरलं. त्यानंतर साडेसात वाजता सर्व आमदार आले आणि चर्चा सुरु झाली. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे ११ वाजता आले. त्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली. आम्हाला सात जणांना मिलिंद नार्वेकरांना मतदान करायचं आणि सहा जणांना शेकापचे जयंत पाटील यांना मतदान करायचं आणि २५ आमदारांनी प्रज्ञा सातव यांना मतदान करायचं असं सांगण्यात आलं होतं”, असं हिरामण खोसकर म्हणाले.

हेही वाचा : “बेईमानी करणाऱ्यांसाठी ट्रॅप लावला होता, त्यात ते अडकले”, काँग्रेसच्या ‘त्या’ ७ आमदारांवर कारवाई होणार; अभिजीत वंजारींची माहिती!

खोसकर पुढे म्हणाले, “विधानपरिषदेसाठी कशा पद्धतीचे मतदान करायचं याबाबतही सांगण्यात आलं होतं. पण यामध्ये एक मतदान फुटलं. ते मतदान कुणाचं फुटलं? मग जयंत पाटील यांना काँग्रेसचे सहा मत द्यायला सांगितले होते. पण काँग्रेसचं एकही मत त्यांना पडलं नाही. आता त्या सहा लोकांवर कुठलीही कारवाई केली नाही. मग ते सहा आमदार कोण होते, ते त्यांना माहिती नाही का? मागच्यावेळी माझ्याकडून चूक झाली होती. त्यानंतर मी वरिष्ठांना सांगितलं होतं की माझ्याकडून चूक झाली. पण यावेळी मी शपथ घेतली होती की मी चुकणार नाही. पण जे सहा आमदार फुटले त्यांच्यावर कारवाई न करता माझी बदनामी सुरु केली आहे, ही बदनामी वरिष्ठांनी थांबवली पाहिजे”, असंही हिरामण खोसकर म्हणाले.

काही आमदार नाराज

“आता लहान तोंडी मोठा घास माझ्या सारख्या लहान कार्यकर्त्यांनी घेऊ नये. मात्र, बरेच आमदार नाराज आहेत. मी गरिब माणूस आहे. आम्ही सन्मानाने राहतो. पाच वर्षात आम्ही कुठेही काही बोललो नाहीत. त्यामुळे आता जी काय बदनामी चालू आहे ती बदनामी पक्षश्रेष्ठींनी थांबवली पाहिजे. तसेच गेल्या पाच वर्षात आमदारांची एक मिटिंगही घेतली नाही. फक्त निवडणूक आली की तुम्ही दोन दिवस बोलवायचं आणि वाऱ्यावर सोडून द्यायचं. तीच मिटिंग आधी झाली असती तर मतदानामध्ये फरक पडला असता”, असंही हिरामण खोसकर म्हणाले.

उमेदवारी द्यायची नसेल तर…

“कोण उमेदवार द्यायचे याबाबत पक्षाला अधिकार आहेत. मात्र, तुम्हाला उमेदवारी द्यायची नसेल तर देऊ नका. पण बदनामी करु नका. मी अजूनही पक्षाबरोबर आहे. पण पक्षाने तिकीट दिले नाही तर मला काही कार्यकर्ते शांत बसू देणार नाही. मग काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. काय भूमिका घ्यायची ते कार्यकर्ते ठरवतील मी ठरवणार नाही”, असा इशाराही हिरामण खोसकर यांनी दिला.

“पक्षश्रेष्ठींनी गेल्या पाच वर्षांत एकाही आमदाराला विचारलं नाही. आमचे काम होतात की नाही होत, याबाबत विचारलं पाहिजे. मात्र, पक्षश्रेष्ठी कधीही विचारत नाहीत. नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष आहेत. पण आमची अपेक्षा आहे की त्यांनी दोन महिन्यांमधून एखाद्या दिवस तरी विचारलं पाहिजे. विकासाच्या बाबातीत बोललं पाहिजे. पण त्यांना भेटलं की फक्त तुम्ही असं केलं, तसं केलं असंच बोलतात. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कधीही ते आमदारांना प्रेमाणे बोलले नाहीत. याबाबत वरिष्ठांकडे काही आमदारांनी तक्रार केली आहे”, असंही हिरामण खोसकर यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla hiraman khoskar on congress state president nana patole and congress mla vidhan parishad election result gkt