सांगली : राजकारणात भागाकार, वजाबाकी होणार नाही याची खबरदारी पक्षाचा अध्यक्ष घेत असतो. यानुसारच सामंजस्याने घरातील फूट टाळण्याचे प्रयत्न केले. मात्र, यात आजपर्यंत आम्हाला यश आलेले नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सांगलीत व्यक्त केले.रविवारी महापालिका पक्षी संग्रहालयाचे उद्घाटन केल्यानंतर आ. पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा >>> नवाब मलिक कोणत्या गटात जाणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…
यावेळी त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीबाबत बोलताना सांगितले, राजकारण बेरजेचे केले जाते. भागाकार अथवा वजाबाकी होणार नाही याची दक्षता पक्षाचे अध्यक्ष या नात्याने घेत असतात. राष्ट्रवादी पक्ष एक कुटुंब आहे. यामुळे घरातील वाद सामंजस्याने मिटविण्याचे प्रयत्न केले तर त्यात वावगे काही आहे असे वाटत नाही.
हेही वाचा >>> “त्यांची भूमिका भाजपाच्या…”, राज ठाकरेंच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर
पक्षातून काही माणसे बाहेर पडत असतील तर ते कसे टाळता येईल हे पाहणे पक्षाच्यादृष्टीने महत्वाचे आहे. माझ्यासह पवार यांचे हितचिंतक यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. शेवटी लढाई सुरू झाली आहे, ती होणारच असेहीते म्हणाले. काही दिवसापुर्वी आपले बंधू भगतसिंग पाटील यांना एका व्यवहारासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाकडून म्हणजेच ईडीकडून बोलावणे आले होते. याबाबत बंधूनी आपले म्हणणे ईडीच्या अधिकार्यासमोर मांडले आहे. पुण्यात झालेल्या बैठकीवेळी हा विषयच आलेला नव्हता. यामुळे ईडी चौकशी आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या भेटीचा काहीच संबंध नाही असेही आ. पाटील यांनी सांगितले.