सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे श्रेय राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्र पवार यांचे अथक परिश्रम व त्यांच्या राज्यातील प्रभावास आहे, अशी भावना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील आपल्या सत्कार समारंभात बोलताना गुरुवारी व्यक्त केली. महाविकास आघाडीस राज्यात ३५ जागा मिळाल्या असत्या,मात्र विरोधकांनी शेवटच्या काही दिवसात पैशाचा प्रचंड वापर केल्याची टिपण्णी त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा >>> देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास, “विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत आपला भगवा..”
आ.पाटील हे पक्षाच्या घवघवीत यशानंतर प्रथमच इस्लामपूरला आल्याने त्यांचे जेसीबीतून फुलांचा वर्षाव,तसेच डीजे, हलगी-घुमक्याचा ठेका,तुतारीच्या निनादात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कुटुंबाच्या वतीने माजी खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सांगली जिल्हा मध्य.बँकेचे अध्यक्ष आ.मानसिंगभाऊ नाईक, आ.अरुणअण्णा लाड,आ.सुमनताई पाटील, श्रीमती अनिता सगरे, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा >>> पालकमंत्र्यांचे विकासकामाकडे दूर्लक्ष, विधानसभेसाठी शिवसेना सज्ज; युवा अध्यक्ष कांबळे
आ.पाटील म्हणाले,महाविकास आघाडीस राज्यात १७-१८ जागाच मिळतील,असे आम्हास हिनविले जात होते. मात्र राज्यातील जनता जनार्दनाने गेम पलटविली आणि महाविकास आघाडीस अभूतपूर्व यश मिळाले. पिपाणी चिन्हाने मतदारांच्यामध्ये काही संभ्रम निर्माण केला. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत. राज्यात जनतेच्या हिताचे सरकार आणण्या साठी येत्या साडेतीन महिन्यात अथक परिश्रम घेऊया. जिल्ह्यात तीन जागा येतील, मात्र आणखी एक जागा वाढवावी लागेल.
माजी खा. पाटील, आ. नाईक, आ. लाड, आ. श्रीमती पाटील, प्रा. यशवंत गोसावी, बाबासाहेब मुळीक, चिमण डांगे आदींनी मनोगत व्यक्त केले. फोटो – इस्लामपूर येथे आ.जयंतराव पाटील यांचा जाहीर सत्कार करताना माजी खा.श्रीनिवास पाटील. समवेत आ.मानसिंग भाऊ नाईक,आ.अरुणअण्णा लाड,आ. सुमनताई पाटील व मान्यवर.