शेकाप आमदार जयंत पाटील यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी केली जाणार आहे. आमदार जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्ता कमी दाखवल्याचा आरोप माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केला होता. या बाबतची लेखी तक्रारही त्यांनी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. अखेर या प्रकरणाची अतिरिक्त आयुक्ताकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे लाचलुचपत विभागाने कळवले आहे.  आमदार जयंत पाटील यांनी जुलै २०१२ मध्ये विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्ता कमी दाखवल्याचा आरोप माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केला होता. प्रतिज्ञापत्रात जयंत पाटील यांनी सन २०१०-११ मध्ये आयकर विवरण पत्रात दाखवलेल उत्पन्न ४८ लाख १८ हजार एवढे आहे. तर स्थावर मालमत्ता ४४ कोटी एवढी दाखवली आहे. मात्र प्रत्यक्ष जाहीर सभेमध्ये आमदार जयंत पाटील स्वत:ची मालमत्ता १०० कोटी असल्याचे आणि कंपन्यांची उलाढाल ३५० कोटींच्या घरात असल्याचा दावा करतात. त्यामुळे जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्ता दडवली असल्याचे सिद्ध होत आहे. आमदार पाटील हे लोकसेवक या संज्ञेत समाविष्ट आहेत. मालमत्तेची खोटी माहिती देऊन त्यांनी आयोगाची फसवणूक केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची प्रिव्हेंशन ऑफ करप्शन अ‍ॅक्ट १९८८ नुसार चौकशी करावी अशी मागणी मधुकर ठाकूर यांनी केली होती. अखेर सदर प्रकरण पुढील चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्ताकडे पाठवले असल्याचे ईमेलने कळवले आहे. दरम्यान मधुकर ठाकूर यांनी ईमेलनंतर समाधान व्यक्त केले आहे. पाटील यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आणि विधान परिषदेच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात विसंगती असल्याचे म्हटले आहे. मुंबईतील दोन घरांबाबतची माहिती आयोगापासून दडवली असल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा