माण तालुक्याचे काँगेसचे आमदार जयकुमार गोरे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली सातारा गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने अटक करण्यात आली. गोरे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक अभिजित काळे यालाही अटक करण्यात आली आहे. दोघेही प्रकृती अस्वास्थ्यामुळे शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत.
याबाबत पोलीस उपाधीक्षक महालक्ष्मी शिवरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दहिवडीजवळील आंधळी विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीच्या काळात दि.१८ मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.तायडे यांचे सातारा येथून अपहरण गोरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. याची तक्रार तायडे यांनी अमरावती येथील गाडगेनगर पोलीस स्टेशनला केली. उपलब्ध सीसी टीव्ही फुटेजच्या पाहाणीनंतर गोरे यांच्यावर सातारा शहर पोलिसांनी दहिवडीजवळ कार्यवाही केली. या प्रकरणी संशयित आरोपी तिघे असून गोरे व काळे यांना अटक करण्यात आली आहे. प्रताप भोसले याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान गोरे यांनी त्यांच्यावरील कारवाई बाबत प्रतिक्रिया देताना, जिल्हा बँकेचे काम पोलीस करत असल्याची टीका केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. या घटनेची माहिती विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे शिवरकर यांनी सांगितले.

Story img Loader