Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी विधानसभेचा निकाल लागणार आहे. त्यामुळे सध्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपल्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसह महायुतीकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. भारतीय जनता पक्षानेही उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करत आतापर्यंत १२१ उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, यामध्ये काही विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे, तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. यामध्ये वाशीम मतदारसंघात भाजपाने भाकरी फिरवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यमान आमदार लखन मलिक (Lakhan Malik) यांचे पक्ष नेतृत्वाने तिकीट कापले आहे. त्यांच्या जागी आता भाजपाने (BJP) पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव श्याम खोडे यांना वाशीममधून संधी दिली आहे. विद्यमान आमदार लखन मलिक यांचा पत्ता कट होताच त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. “इमानदारीने पक्षाचं काम केलं. मी कोणताही भ्रष्टाचार केला नाही. पक्षाने माझ्यावर थोडातरी विश्वास ठेवायला पाहिजे होता”, अशी प्रतिक्रिया देत आमदार लखन मलिक यांना अश्रू अनावर झाले होते.

हेही वाचा : वरुण सरदेसाईंना वांद्रे पूर्व मतदारसंघ दिल्याने काँग्रेसचे सचिन सावंत नाराज! रमेश चेन्निथलांना काय केली विनंती?

दरम्यान, वाशीम मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार लखन मलिक करीत होते. ते २००९ पासून सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघामधून निवडून आले होते. तसेच त्याआधी १९९० मध्ये देखील ते विजयी झाले होते. वाशीममध्ये पक्षांतर्गत लखन मलिक यांच्याविषयी तीव्र नाराजी होती, त्यामुळे त्यांचे तिकीट कापण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

तिकीट नाकारल्यानंतर लखन मलिक काय म्हणाले?

“वाशीम मतदारसंघामधून मी चारवेळा आमदार झालो. त्यामुळे मला माझ्या पक्षावर विश्वास होता की, मला पक्ष तिकीट देईल. मला आताच समजलं की दुसऱ्यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे मी आत्ता काही बोलणार नाही. पण सर्व कार्यकर्त्यांना बोलावून माझी भूमिका मी स्पष्ट करेन. मात्र, आमच्या नेत्यांनाच माहिती की मला उमेदवारी का दिली नाही? आम्ही इमानदारीने पक्षाचं काम केलं. त्यामुळे आम्हाला विश्वास होता की आम्हाला तिकीट मिळेल. पण आता माझ्यावर अन्याय झाला आहे. कारण मला संधी द्यायला हवी होती. मी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही. पक्षाला बदनाम केलेलं नाही. कोणालाही फसवलं नाही. त्यामुळे पक्षाने माझ्यावर थोडातरी विश्वास ठेवायला पाहिजे होता”, असं आमदार लखन मलिक यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla lakhan malik shed tears maharashtra assembly election 2024 in washim constituency sitting mla lakhan malik was rejected by bjp gkt