वाई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय आमदार मकरंद पाटील यांनी घेतला आहे. आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंडखोरी करून भाजपा शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपद व आठ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी आमदार मकरंद पाटील हे अजित पवार यांच्याबरोबर असल्याची माहिती समाजमाध्यमांवर व बातम्यांमध्ये येत होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा सगळा घटनाक्रम घडत असताना पक्षाध्यक्ष शरद पवार हे सोमवारी सातारा जिल्ह्यामध्ये आले होते. यावेळी आमदार पाटील यांनी स्वतः मतदारसंघाच्या आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर त्यांचे स्वागत केले. पूर्ण दौऱ्यात ते त्यांच्याबरोबर होते.
हेही वाचा – “मोदीजी कोणता साबण वापरलात?”, महाराष्ट्रातल्या ‘त्या’ घटनेवरून एमआयएमचा प्रश्न
आज त्यांनी किसनवीर कारखान्यावर वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यामध्ये त्या दिवशी मुंबईमध्ये घडलेला घटनाक्रम सांगितला. किसनवीर कारखान्याच्या कामासंदर्भात शनिवारी अजित पवार यांच्या निवासस्थानी मी व नितीन पाटील चर्चेला गेलो होतो. त्यावेळी मंत्रिमंडळ शपथविधी किंवा भाजपा सरकारला पाठिंबा देणे हा विषय चर्चेमध्ये नव्हता. यावेळी आमच्यासोबत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी दहा वाजता आमचे पुन्हा भेटण्याचे ठरले होते. रविवारी सकाळी आम्ही त्यांच्या बंगल्यावर गेलो तेव्हा त्यावेळी तिथे माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे माझ्या लक्षात आले. त्यावेळी मंत्र्यांच्या शपथविधीची नावे राज्यपालांना कळविताना पहिल्या यादीमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घ्यायची असल्याचे मला सांगण्यात आले. मात्र मी माझ्या कुटुंबाशी, कार्यकर्त्यांशी व मतदारसंघातील नेत्यांशी चर्चा केलेली नव्हती, त्यामुळे मी असा निर्णय घेऊ शकत नाही, असे त्यांना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून लक्ष्मणराव पाटील शरद पवार यांच्यासोबत होते. आमच्या कुटुंबावर शरद पवारांनी भरभरून प्रेम केले व ताकद दिली आहे. सातारा जिल्ह्याचे राजकारण हे यशवंत विचारांचे राजकारण असून या विचारांपासून आम्ही दूर जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे आमदार मकरंद पाटील यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा – शासनाकडून एक पैशाच्याही मदतीविना बार्शीची निर्भया वाऱ्यावर
या बैठकीत मतदारसंघातील प्रतापराव पवार, नितीन भरगुडे पाटील, शशिकांत पिसाळ, बाबुराव सपकाळ, संजय गायकवाड आदींची भाषणे झाली. या बैठकीला बकाजीराव पाटील, दत्ता नाना ढमाळ, उदय कबुले, मनोज पवार, प्रमोद शिंदे, राजेंद्र राजपुरे, नितीन भिलारे, राजेंद्र तांबे, राजेंद्र अण्णा भिलारे, विमलताई पार्टे आदी अनेक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला.