मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता समस्त मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मनोज जरांगे पाटलांनी आमदार खासदारांनाही या आंदोलनात उतरण्याचं आवाहन केलं आहे. आमदार खासदारांनी त्यांच्या अधिकारातून आरक्षणाची मागणी लावून धरण्याचं आवाहन जरांगेंनी केलं होतं. त्यानुसार, अनेक मराठा समाजातील नेते मुंबईत दाखल झाले आहेत. याबाबत आज मनोज जरांगेंनी भाष्य केलं आहे. उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून मुख्यमंत्र्यांनी आज त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेतून मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधला.
मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर फोनवर आरक्षणावरच चर्चा झाली. दुसरी कुठलीही चर्चा झालेली नाही. आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, नोंदीनुसार आरक्षण घ्यायला आम्ही तयार नाही. त्या समितीचा प्रथम अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय त्यांनी घ्यावा. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं.
हेही वाचा >> “तातडीने विशेष अधिवेशन बोलवा आणि…”, मनोज जरांगेंची सरकारला विनंती; म्हणाले, “अर्धवट आरक्षण…”
पुढे जरांगे म्हणाले की, मी सर्व आमदार खासदारांना आवाहन केलं होतं की तुम्ही सगळे मुंबईत आणि तिथं आवाज उठवा. गोर-गरीब लेकांच्या पाठीशी उभे राहा. एकही मराठा तुम्हाला विसरणार नाही. पण मागणी करताना महाराष्ट्राची करा (सरसकट मराठा प्रमाणपत्र), हे त्यांना सांगितलं होतं. बऱ्याच प्रमाणात आता आमदार घरी नाहीत. सगळे बहुतेक मुंबईत गेलेले आहेत. मराठा समाजासाठी काम करत आहेत. मराठा समाज त्यांचं योगदान विसरणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
मराठा समाज तुम्हाला कधीच विसरणार नाही
“परंतु, आमदार -खासदार राजीनामा का देत आहेत हे कळत नाही. राजीनामा देण्यामागचा फायदा-तोटा मला कळत नाही. पण मी सर्व आमदार-खासदारांना सांगतो की तुम्ही मुंबईतच थांबा. आरक्षण मिळाल्याशिवाय यांचा पिच्छा सोडू नका. आम्ही काय इथून हटत नाही. सर्व आमदार-खासदार, माजी मंत्र्यांनी, नेत्यांनी प्रचंड मोठा गट तयार करावा. मुंबई सोडायची नाही. मंत्रायल आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची दारं सोडायची नाहीत. त्यांचे पाय पकडून त्यांच्या मागे लागायचं. सरकारला अधिवेशन घेण्यासाठी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरा. मराठा समाज यांना कधीच विसरणार नाही असा शब्द देतो”, असं आश्वासनही मनोज जरांगेंनी दिलं.