MLA Nitin Deshmukh on Shivsena Dispute and 2022 Maharashtra political crisis : “मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं होतं”, असा दावा शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. “सुरतमध्ये माझा घातपात करण्याचा कट काही लोकांनी रचला होता”, असंही बाळापूरचे आमदार देशमुख म्हणाले. देशमुख यांनी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) बाळापूरमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते मतदारसंघातील जनतेला उद्देशून म्हणाले, “माझ्यामागे या सत्ताधाऱ्यांनी चौकशीचा ससेमिरा लावला आहे. माझ्या दहावीत शिकणाऱ्या मुलाची चौकशी चालू आहे. आठवी इयत्तेत शिकणाऱ्या माझ्या मुलीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जात आहे. हे सगळं पाहूनही तुमचा हा आमदार कधी डगमगला नाही. पक्ष फुटला तेव्हा मी सुरतला गेलो होतो. कुठल्या परिस्थितीत त्या लोकांनी मला नेलं, माझा घात केला ते तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे”.

नितीन देशमुख म्हणाले, “पक्ष फुटले, गद्दारी झाली त्या काळात मला सुरतला कशा पद्धतीने नेलं हे मी यापूर्वी देखील सांगितलं आहे. त्या लोकांनी मला इंजेक्शन दिलं आणि घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी वृत्तवाहिन्यांना बातमी दिली की आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. खरंतर मला असा कोणताही झटका आला नव्हता. त्यांना केवळ तशी बातमी पसरवायची होती. ती बातमी केवळ तुमच्या या आमदाराचा घातपात करण्यासाठीच पसरवली होती”.

हे ही वाचा >> मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची स्वित्झर्लंड दौऱ्यात १.५८ कोटींची उधारी, कंपनीनं पाठवली कायदेशीर नोटीस

“नितीन देशमुख ऐकत नसेल तर त्याचा गेम करा, असे आदेश दिले होते”

एका भाजपा आमदाराचं ट्रेनमध्ये वरिष्ठांशी बोलणं झालं. दिल्लीतून फोन आला होता की कोणत्याही परिस्थितीत नितीन देशमुख परत जाता कामा नये. त्याला हवं तर मारून टाका, त्याचा गेम करा. त्याचदरम्यान, टीव्हीवर बातमी झळकली की आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. मला कोणताही झटका आला नव्हता. केवळ त्या लोकांना वरून (वरिष्ठांचा) फोन आला होता की नितीन देशमुख ऐकत नसेल तर त्याचा गेम करून टाका. मला मारून तशी बातमी दाखवली जाणार होती. हे सगळं भाजपाचा एक आमदार सांगत होता. परंतु, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. उद्धव ठाकरे यांचा मावळा आहे. मी त्यांच्यासमोर झुकलो नाही. गद्दारांबरोबर गेलो नाही”.

हे ही वाचा >> Sanjay Raut : “हर्षवर्धन पाटील शांत झोपेसाठी भाजपात गेलेले, आता मविआत आल्यावर…”, संजय राऊतांची कोपरखळी

नितीन देशमुख जनतेला म्हणाले, “माझी तुम्हा मतदारांकडून एकच अपेक्षा आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या (शिंदे) उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. तेव्हाच माझं समाधान होईल. तुमच्या या आमदाराला पराभूत करण्यासाठी केवळ साधेसुधे प्रयत्न चालू नाहीत तर कटकारस्थानं चालू आहेत”.