भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच एका भाषणातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा उल्लेख ‘शिल्लकसेना’ असा केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावरून ठाकरे गटाचे नेते आणि गुवाहाटीहून परत आलेले आमदार नितीन देशमुख यांनी बोचरी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी स्वत:चा पक्ष आणि नरेंद्र मोदी यांचं नाव बाजुला केलं, तर त्यांना त्यांची किंमत कळेल, अशा शब्दांत टीकास्र सोडलं आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या विधानाबाबत विचारलं असता नितीन देशमुख म्हणाले, “देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना ‘शिल्लकसेना’ म्हणतात, उद्धव ठाकरेंजवळ पक्ष आणि चिन्ह नाही, असं म्हणतात. पण आता ते (देवेंद्र फडणवीस) आत्मचिंतन करत आहेत. त्यांनाही माहीत आहे की, पक्ष आणि चिन्ह नसताना उद्धव ठाकरेंच्या सभेला लाखोंच्या संख्येने लोक येत आहेत. महाराष्ट्रातील मराठी आणि हिंदू माणूस उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे.
हेही वाचा- “माईक घेताना महिलेच्या अंगावरून हात…”, वकिलाच्या ‘त्या’ कृत्यावर सरन्यायाधीश भडकले
“देवेंद्र फडणवीसांनी स्वत:च्या पक्षाचं नाव आणि नरेंद्र मोदींचं नाव बाजुला करून महाराष्ट्रात फिरावं, त्यांच्या सभेला दहा लोकही उपस्थित राहणार नाहीत. ते पक्षाचं नाव बाजुला करून महाराष्ट्रात फिरले, तर व्यक्ती म्हणून त्यांना किती किंमत आहे? हे कळेल. उद्धव ठाकरेंना ‘शिल्लकसेना’ म्हणण्यापेक्षा तुमचं वैयक्तिक अस्तित्व काय आहे? ते आधी पाहा,” असा टोलाही नितीन देशमुखांनी लगावला.
देवेंद्र फडणवीसांना उद्देशून नितीन देशमुख पुढे म्हणाले, “तुम्ही उद्धव ठाकरेंचं पक्ष आणि चिन्ह जबरदस्तीने काढून घेतलं. तरीही त्यांच्या सभेला लाखोंच्या संख्येनं गर्दी जमा होते. तुम्ही पक्षाचं नाव बाजुला करून सभा घेण्यास गेलात तर तुमच्या सभेला दहा लोकही गोळा होणार नाहीत, अशी परिस्थिती तुमची महाराष्ट्रात आहे. तुम्हाला उद्धव ठाकरेच सगळीकडे दिसत आहेत. तुमच्या मनात भीती निर्माण झाली आहे, म्हणून वारंवार तुम्ही उद्धव ठाकरेंचं नाव घेत आहात.”