लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मताधिक्याचा नवा इतिहास घडवून, विधानसभेच्या सहापकी ५ जागा जिंकून नेतृत्व सिद्ध करणाऱ्या आमदार पंकजा मुंडे यांना राज्याच्या नवीन सरकारमध्ये कोणते मंत्रिपद मिळते, याची उत्सुकता जिल्हय़ातील जनतेला आहे.
दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर अवघ्या तीन महिन्यात दुखातून बाहेर येत पंकजा मुंडे यांनी सिंदखेड राजा ते चौंडी अशी ४ हजार किलोमीटर संघर्षयात्रा काढली. निवडणुकीच्या प्रचारात महिनाभरात अडीचशे सभा घेऊन ६७ मतदारसंघात सभांचा धडाका लावला. लोकसभा पोटनिवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे ६ लाख ९२ हजारांच्या विक्रमी मताधिक्क्याने विजयी झाल्या. मताधिक्क्याचा देशात विक्रम केला. विधानसभेच्या सहापकी ५ जागा जिंकून पक्षाला पूर्ण यश मिळवून दिले. मराठवाडय़ातही १५ जागा निवडून आणण्यात मोठी भूमिका बजावली.
राज्यात भाजप सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे यांचेही नाव मुख्यमंत्रिपदाच्या चच्रेत होते. फडणवीस यांचे नाव नक्की झाल्याने आता पंकजा मुंडे यांना कोणते मंत्रिपद मिळते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दिवंगत मुंडे यांचा वारसा सक्षमपणे चालवणाऱ्या पंकजा यांना पक्षनेतृत्व काय न्याय देते, याचीही उत्सुकता आहे. भाजपच्या पातळीवर सर्वाधिक मतदारसंघात सभा घेणाऱ्या व गर्दी खेचणाऱ्या ओबीसींच्या आमदार पंकजा मुंडे एकमेव नेत्या आहेत. सत्तेत सामाजिक समतोल दिसावा, यासाठी पक्ष नेतृत्व पंकजा मुंडे यांना चांगली संधी देईल, असे मानले जात आहे.